Monday 20 February 2012

एक होती बाहुली

 एक होता बाहुला आणि एक होती बाहुली. बाहुला दिवसभर लाकडे तोडायचा. ती विकून मग सायंकाळी घरी परतायचा.एक दिवस तो काम करून दमून्-भागून घरी आला. बाहुलीला म्हणाला,' बाहुली! मी आज खूप थकलोय. जरा पाणी गरम केलंस तर अंघोळ करीन म्हणतो. तेवढेच ताजेतवाने वाटेल.'
बाहुली म्हणाली, ' का नाही, आता करून देते. तिथे तो हंडा पडला आहे. तो आणा इकडे.'
बाहुल्याने हंडा उचलला आणि विचारलं,' आता काय करू?'
बाहुली बोलली,' आता जवळच्या  आडाचं त्यात पाणी भरून आणा.पाणी आणल्यानंतर हंडा चुलीवर ठेवा.'
बाहुल्यानं हंडा चुलीवर ठेवला. आणि म्हणाला,' आता काय करू?' त्यावर बाहुली म्हणाली, ' आता चुलीत जाळ घाला. पाणी आपोआप गरम होईल."
पाणी गरम झाल्यावर बाहुली म्हणाली," हंडा न्हाणीजवळ ठेवा. आणि मस्तपैकी अंघोळ करा."
बाहुल्याने हंडा ठेवला. कपडे काढले. अंग चोळून अंघोळ केली. अंग पुसत पुसत बाहुला म्हणाला," आता किती बरं वाटतं. अंग कसं ताजं तवानं, हलकं हलकं झालं आहे. तू रोज असंच पाणी गरम करून देत जा म्हणजे अशी मी रोज अंघोळ करत जाईन." '
बाहुली म्हणाली, " यात काय एवढं! तुम्हीच आळस करता. जा आता झोपा जा."  ..                              

No comments:

Post a Comment