Monday 20 February 2012

मनाला लगाम

इतिहासातल्या तैमूरलंगला कोण ओळखत नाही. तो एक क्रूर, आततायी पण बुद्धिमान शासक होता. एका पायानं लंगडा असल्यानं त्याच्या नावापुढं 'लंग' हा शब्द लागलेला होता. तो दिसायला अत्यंत कुरूप होता, मात्र साहस आणि समजुतदारपणा त्याच्या अंगी ठासून भरलेला होता. तो नेहमी घोड्यावर स्वार असायचा. त्याने कित्येक प्रदेश जिंकत, लुटत आणि मिटवून टाकत काबूल, कंदहारहून हिंदुस्थानात आला. इथे त्याने मनसोक्त लुटमार केली. इथून परत जायला निघाला तेव्हा दिल्लीच्या शासकाने त्याला भेट म्हणून हत्ती पेश केला. तैमूर पहिल्यांदा हतीवर बसला. बसल्यावर लगेचच म्हणाला,' याची वेसन आता माझ्या हातात द्या. ' त्याला सांगितलं गेलं की, हा हत्ती आहे. याला वेसन असत नाही. तुम्ही मध्ये आरामशीर बसा. पुढे त्याचा माऊत बसेल, तोच छोट्याशा अंकुशद्वारा हत्तीवर नियंत्रण मिळवेल.
तैमूर तात्काळ हत्तीच्या पाठीवरून खाली उतरला. म्हणाला,' मला असली सवारी नको आहे, ज्याची वेसन माझ्याऐवजी कुणा दुसर्‍याच्या हातात असेल.' मनरुपी घोड्याचे वेसन्सुद्धा अशाप्रकारे आपल्या हातात्च ठेवायला हवे. त्याला काबूत ठेवा. अन्यथा मनरुपी घोड्यावर तुम्ही नाही तर तोच तुमच्यावर स्वार होईल. नियंत्रण अथवा लगाम आपल्या हाती असणं खूप आवश्यक आहे.
आजची सगळ्यात मोठी समस्या आहे ती, इमोशनल प्रॉब्लेमची! संवेग खूप प्रबळ आहे. त्यावर नियंत्रण आवश्यक आहे. शब्द,रूप, रस, गंध, स्पर्श या सगळ्या वस्तू लुभावणार्‍या आहेत. आपण यांचे दास बनून जातो. संयम बाळगत नाही. यांच्या मागणीला आपण चटकन होकार देऊन जातो. भाव  क्षणक्षणाला भटकवतात.  जोपर्यंत इंद्रियांवर , मनावर आणि आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण राहणार नाही, तोपर्यंत नैतीकतेच्या गोष्टी केवळ सांगून किंवा ऐकून आचरणात येणं अशक्य आहे.  सतत चौखूर उधळणार्‍या मनाला नियंत्रणात ठेवणे ही तारेवरची कसरत असली तरी न कंटाळता नियंत्रणासाठी प्रयत्नशील असण्यातच माणसाचे कल्याण आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. ..                                                                                       

No comments:

Post a Comment