Monday 20 February 2012

भाज्यांनी धडा शिकवला

 .
टप्पूला चॉकलेट, कुरकुरे असलं बाहेरचं खाणं फार आवडे. चाट मसाल्याचा तर भारी शौकीन. त्याला आवडत नसायच्या त्या म्हणजे भाज्या. कुठलीच भाजी त्याला आवडायची नाही. त्यापासून बनवलेल्या कुठल्याही पदार्थांकडे तो ढुंकूनही पाहत नसे. त्याच्या या वाईट सवयीमुळे त्याची मम्मी त्याला नेहमी रागे भरायची. उपदेशाचे डोस द्यायची. पण टप्पूवर त्याचा काही एक परिणाम व्हायचा नाही. मम्मी पार वैतागून गेली होती.

टप्पूचा मामा येणार म्हणून मम्मीने त्याच्या आवडीचा गाजर हलवा बनवला होता. गोड तुपातला चवदार हलवा टप्पूनेही खावा म्हणून मम्मीने त्याला खूप सांगितले. पण व्यर्थ. तो आपल्या जिद्दीवर ठाम राहिला.
आपले सारे जग कोडकौतुक करतं. आपला महिमा गायिला जातो. पण हा टप्पू मात्र आपली हेटाळणी करतो. आपल्याकडे धुंकूनही पाहत नाही. याचा राग भाज्यांनाही होता. टप्पूला धडा शिकवायचा त्यांनी निश्चय केला.
टप्पूचा मामा आल्याने रात्री जेवणाचा मोठा बेत केला  होता. इकडे भाज्यांनीही आपली योजना साकारायला सुरुवात केली होती. दिवाणखान्यात मात्र मस्त गप्पाटप्पा रंगल्या होत्या. मामा आपल्या भाच्याला झक्कास गोष्टी सांगत होता. टप्पू त्या मन लावून ऐकत होता. स्वयंपाक खोलीतून घमघमाट सुटला होता. सगळ्यांना कडकडू भूक लागली होती. मम्मीने जेवण तयार असल्याची वर्दी दिली तशी सारी मंडळी जेवणाच्या टेबलाभोवती गोळा झाली.
बासुंदी, पुरी, गुलाम जामून ,विविध प्रकारच्या भाज्या, झक्कास रस्सा, पापड, कुरडई, लोणचे असा सारा बेत होता. टप्पूने घाईघाईने पुरीचा तुकडा  बासुंदीत बुडवून खाल्ला. " ई! बासुंदी कडू कशी काय? " टप्पू ओरडला. पप्पा ओरडले , " काय तर काय  बोलतोयस टप्पू? बासुंदी आणि कडू... ? वेडबिड तर लागलं नाही ना"
मामा म्हणाला, " अरे, टप्पू, बासुंदी किती गोड झालीय. आणि त्याला तू कडू म्हणतोयस ?" पण यातला मामला कुणालाच माहित नव्हता. कारण कारल्यानं आपला रस पिळून टप्पूच्या बासुंदीच्या वाटलीत टाकला होता. टप्पू मात्र त्या वाटीला हात लावायलासुद्धा तयार नव्हता. मम्मीने त्याला गुलाब जामून दिले. त्याने एक जामून तोंडात टाकले. टप्पूने ते पटकन थुंकून टाकले. दोड्क्याने बचकभर मीठ त्यात टाकले होते. " यात मीठ कोणी टाकले? ममीने जामून खाऊने पाहिले तर गोड लागले. मम्मी म्हणाली , जामून तर गोड आहे. " आता तीसुद्धा टप्पूवर चिडली. सगळे शांत आणि मनसोक्त जेवत होते. फक्त टप्पू मात्र कुरापती काढत  होता. " जेवायचे असेल तर जेव नाही तर उठून जा', मम्मी ओरडली. टप्पू मुकाट्याने उठून गेला.
रात्री सारे आपापल्या बिछान्यावर झोपी गेले. टप्पू अगोदरच येऊन पडला होता. पण त्याला झोप येत नव्हती. प्रचंड भूक लागली होती. पोटात कावळ्यांनी नुसता धिंगाणा घातला होता. सगळीकडे सामसूम झाल्यावर टप्पू हळूच गुपचूप उठला. त्याने स्वयंपाक खोलीत जाऊन फ्रिज उघडला. कॅडबरी उचचली.  त्याचा लचका एक तोडला. पण कॅडबरी गोड लागण्याऐवजी तिखटजाळ लागली. तुकडा थुंकून दिला. बटाट्याने त्यात तिखट मिसळले होते. प्लेटमध्ये त्याला हलवा दिसला. जिभेचा दाह कमी होईल म्हणून त्याने एक चमचा हलवा तोंडात टाकला. गोड गोड हलव्याच्या  थंडव्याने त्याला खूप बरे वाटले. दाह कमी झाला. त्याने आवडीने सगळा हलवा संपवून टाकला.  आणि शांत झोपी गेला.
 सकाळी मम्मीने फ्रिज उघडला. त्यात हलव्याची प्लेट रिकामीच दिसली. तिने सगळ्यांना विचारले. टप्पूने आपण खाल्ल्याचे कबूल केले. सगळ्यांना आश्चर्य वाटले. भाजी आणि भाज्यांच्या पदार्थांना नावे ठेवणारा , त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहणारा टप्पूने हलवा खाऊन टाकला  तोही न सांगता. टप्पू म्हणाला, " यापुढे भाज्यांना नावे ठेवणार नाही. भाज्या चांगल्या असतात, हे आता मला कळून चुकले आहे. "                                                        

न्यायी राजा

राजा चंद्रसेन मोठा शूर, दानी आणि न्यायी होता.  अनोख्या न्यायाबद्दल त्याची ख्याती होती. चंद्रसेन राजाच्या राज्यात दुर्गापूर नावाचे एक गाव होते. तेथील प्रजा सर्वार्थाने सुखी होती. पण काही दिवसांपासून गावची झोप उडाली होती. गावात चोर्‍या हो ऊ लागल्या होत्या. गावात कोणी अनोळखी मुक्कामी राहिल्यास तर हमखास चोरी होत असे. त्यामुळे वाटसरू अथवा अनोळखी माणसाला गावात मुक्कामाला राहू दिले जात नसे.
एकदा एक ब्राम्हण कुठे तरी निघाला होता. प्रवासात अंधार पडल्याने त्याने दुर्गापूर गावात मुक्कम करण्याचे ठरविले. मात्र त्यास कोणी राहण्यास जागा दिली नाही. शेवटी खूप विनंती-विनवणी केल्यावर एका विणकर्‍याने त्याला राहण्यास परवानगी दिली. मात्र विणकर्‍याने बजावून सांगितले, कोणी परका गावात आला की हमखास चोरी होते. त्यामुळे सकाळी जाताना सर्व चिजा दाखवून पुढच्या वाटेला निघावं , हे चांगल.
ब्राम्हणाने अट कबूल केली. दोघेही अंथरुणावर पहुडले. विणकरास लागलीच झोप लागली परंतु, ब्राम्हण जागाच होता. नवी जागा, चोरीची भीती यामुळे त्याला झोप येत नव्हती.पहाटे पहाटेच्यावेळी डोळे जड हो ऊ लागले होते, तेवढ्यात घरात कोपर्‍यात कोणीतरी अंधारात चाचपडत असल्याचे त्याला दिसले. ब्राम्हण खडबडून जागा झाला. त्याने अंधारातच त्याठिकाणी झडप घातली. त्याच्या हाताला एक चोर लागला. चोर दरडावत म्हणाला, स्वतः ची पर्वा असेल तर मुकाट्याने मला सोड. तुला ठाऊक नाही, मी इथला पाहरेकरी आहे.
ब्राम्हणाने त्याच्या धमकीला भीक घातली नाही. उलट ब्राम्हण म्हणाला, ' तुला सोडलो तर सकाळी मलाच चोर समजलं जाईल'  दोघात झटापट झाली. ब्राम्हणाने  जखडून ठेवल्याने पाहरेकर्‍याने नवीन्च युक्ती काढली आणि ब्राम्हणाचा हात धरून जोरजोरात ओरडू लागला, चोर, चोर... धावा.. धावा
विणकर्‍यास आजूबाजूचे लोक धावले. पाहतात तर पाहरेकरी आणि ब्राम्हण. पाहरेकर्‍याने ब्राम्हणाचे हात धरलेले. लोकांनी पाहरेकर्‍याची बाजू घेतली. शेवटी न्याय राजाच्या दरबारात गेला. ब्राम्हणाने सारी हकिकत कथन केली. त्याच्या चेहर्‍यावरील विश्वास पाहून राजाने ब्राम्हण चोर नसल्याचे ताडले. तो निर्दोष आहे. परंतु, निर्दोष असल्याचा पुरावा दरबारास हवा होता. राजाने त्यांना तीन दिवसानंतर पुन्हा दरबारात येण्यास सांगितले.
तिसर्‍या दिवशी दोघेही दरबारात आले. तेव्हा राजाने दोघांनाही हुकूम सोडला. इथून एका मैलावर एक नदी आहे. त्याच्या काठावर कापडात एक मृतदेह गुंडाळून ठेवला आहे. तो तुम्ही दोघांनी अलगद दरबारात आणा. आल्यावर तुमचा फैसला सुनावला जाईल. सेवक आणि ब्राम्हण दोघेही निघाले. नदीच्या काठावर खरोखरच कापडात गुंडाळलेला मृतदेह होता. दोघांनी तो अलगद उचलला. परताना सेवक खुशीत होता.  तो म्हणाला,पंडीत महाशय, आता कसं वाटतंय. गेल्यावर चापकाचे फटके बसतील तेव्हा कळेल, माझ्याशी पंगा घेतोस काय?
बिचारा ब्राम्हण निराश झाला होता. तो एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, माझ्यासारख्या निर्दोषाला हकनाक गोवलंस. राजाची शिक्षा मी सहन करीन. पण वरचा देव तुला कदापि माफ करणार नाही. अशा भल्या-बुर्‍या गोष्टी ऐकत्-ऐकवत दोघे दरबारात पोहचले. त्यांनी मृतदेह खाली ठेवला. राजाने त्यावरील कापड हटवण्यास सांगितले. कापड हटवले गेले आणि काय आश्चर्य! मृतदेहाऐवजी एक जिवंत व्यक्ती उठून उभी राहिली.
वास्तविक राजाच्या सूचनेनुसार गुप्तहेर कापडात पहुडला होता. त्याने वाटेतला दोघांमधला संवाद राजापुढे कथन केला. ते ऐकून राजाने पाहरेकरी सेवकास शंभर फटक्याची तसेच तडिपारची शिक्षा सुनावली. ब्राम्हणाला काही धन देऊन राजाने त्याची सन्मानाने पाठवणी केली. यानंतर मात्र कधी दुर्गापूर गावात चोरी झाली नाही. .- मच्छिंद्र ऐनापुरे, जत  gavakari.sap.11

न्यायी राजा

अहंकार गळाला

एक पैलवान होता. कुस्तीत त्याला तोड नव्हती. साहजिक त्याच्यात अहंकार भिनला होता. तो इतका की बोलायचे काम नाही. कोणी कुस्ती खेळतोय म्हटलं की, पट्ट्या त्याच्या दारात हजर असायचा. त्याला धमकी द्यायचा. आव्हान द्यायचा. समोरच्याला चितपट केल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. दुसर्‍याला पराजित करण्यात आसुरी आनंद वाटत असे. एखाद्याला मैदानात चितपट केल्यावर अहंकाराने तो मोठ्याने फुत्कारायचा. " आहे का कुणी माय का लाल, माझ्याशी कुस्ती लढायला तयार? या समोर असे."
या त्याच्या अहंकारी वागण्याने त्याच्याशी कोणीही कुस्ती लढायला तयार होत नसे. इतकेच काय तर त्याच्या वार्‍यालाही कोणी थांबत नसे. बोलणे तर दूरच! दिवस जात होते. आता पैलवानास एकटेपणाचा उबग येऊ लागला. एकटेपण त्याला खायला उठले. त्याची मनस्थिती बिघडू लागली. तो कुणाशी बोलायला जाई, पण ती माणसे निमुटपणे उठून निघून जात.
 एकदा एक संत महात्मा गावात आला. गावाबाहेर नदीकाठी झोपडी बांधून राहू लागला. त्यांना भेटायला , आशीर्वाद घ्यायला दूर्-दूरवरून लोक येत. संत महात्मा त्यांच्या अडीअडचणी, समस्यांचे निराकरण करीत असे. त्यामुळे त्यांचे महात्म्य दूर दूर पसरले होते. संतांचा महिमा पैलवानाच्याही कानी पडला. एक दिवस तोही संतांच्या भेटीला गेला.
" महाराज, मी एक प्रसिद्ध मल्ल आहे. माझा कुणीही पराजय करू शकला नाही. माझ्याजवळ खूप धन-दौलत, मान्-सन्मान आणि ऐश्वर्य आहे. पण माझे चित्त अशांत आहे." संतांनी स्मितहास्य केले, " मी तुझे नाव ऐकून आहे, आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. पैलवानी ही एक कला आहे. ती अभ्यास, सरावाने साध्य होते. ..." त्यांचे बोलणे तोडत पैलवान मध्येच म्हणाला," महाराज, मी यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. दाही दिशांत माझ्यासारखा पैलवान शोधूनही सापडणार नाही. "  संत पुन्हा हसले आणि म्हणाले, " अहंकार रावणालासुद्धा होता. पण या अहंकाराने त्याची सारी शक्ती हिरावून नेली.जरा विचार कर. तू ज्या कुणाचा पराभव करायचास त्याला त्याचं दु: ख तर वाटत असणारच. तू कधीही पराजित झाला नाहीस. सदा जयाचीच चव चाखत आलास. त्यामुळे तुझ्या प्रत्येक विजयाने तुझा अहंकार वाढत गेला. पण माझ्या पैलवान मित्रा, जीवनातले सारे यश केवळ विजयात असत नाही. उद्या तुझे शरीर थकून जाईल. जर्जर होईल. हात-पाय कंप पावतील्.तेव्हा तुझा अहंकार आपोआप गळून पडेल. अजून वेळ गेलेली नाही. तुझे अशांत चित्त शांत कर. तुझ्यानंतर या धन्-दौलत, मान्-सन्मान, ऐश्वर्याला काय अर्थ आहे? तेच तू गोरगरीब, वंचितांच्या सत्कारणी लाव. असाह्य लोकांची सेवा कर. मग बघ, तुझा एक चांगला मल्ल त्याचबरोबर एक सच्चा साधक म्हणून नावलौकिक मिळेल. लोक तुझे गुणगान गातील."
पैलवान सदगदीत झाला, '" तुम्ही मला एक नवी वाट दाखवलीत. महाराज, तुम्ही माझे डोळे उघडलेत...मला आता जीवनाचं रहस्य समजलं", असे म्हणत पैलवानाने संतांचे पाय धरले.                                

दृष्टीकोन

एक श्रीमंत व्यक्ती नेहमी आचार्य महाप्रज्ञ यांच्याकडे येत असे. ती व्यक्ती मोठी उद्योगपती होती. एकदा आचार्यांनी त्याला विचारलं, ' सध्या तुझ्याविरोधात वीस-पंचवीस केसेस चालू आहेत. तुझ्या अनेक प्रतिष्ठानवर कित्येकदा छापे पडले आहेत. काही कंपन्यांना सिल ठोकण्यात आले आहे. इन्कम टॅक्सवाल्यांचा तर सतत तुझ्यावर डोळा असतो. कॉरपोरेट विश्वात तू एक 'बदनाम व्यक्ती' म्हणून ओळखला जातोस. या सगळ्या गोष्टींमुळे तुला  कसलं सुख मिळतं?'
ती  व्यक्ती पहिल्यांदा थोडं गांभिर्यानं, नंतर बेपर्वाईनं म्हणाली, ' महाराज, माझी एक इच्छा होती की, मी देशातला एक नंबरचा उद्योगपती बनावं. मी या दिशेने वाटचाल केली. करोडोंची संपत्ती जमा केली. माझ्या मनाला मोठी शांती मिळाली. आता मी या संपतीचा भोग घेऊ अथवा ना घेऊ, याचा माझ्यावर आता काहीही परिणाम होत नाही. कोण माझ्याबाबतीत काय म्हणतो, काय विचार करतो, याची मला अजिबात पर्वा वाटत नाही.'
प्रत्येकाचं आपापलं चिंतन असतं. विचार करण्याची  पद्धतसुद्धा वेगळी असते. आपण नैतिकता, प्रामाणिकपणा, त्याग , संयम, अनुकरण इत्यादी गोष्टींबाबत बोलत असतो.  पण 'व्यक्ती तितक्या प्रकृती'  या न्यायानं प्रत्येकाचा विचार करण्याचा एक अंदाज असतो. त्यामुळे पहिल्यांदा समोरच्या व्यक्तीचा दृष्टीकोन , विचार समजून घेतला पाहिजे. माणसं समजून घेणं त्यामुळेच कठीण जात असतं. त्याचा दृष्टीकोण   चांगला की वाईट हा नंतरचा प्रश्न.  कारण तो त्याच मस्तीत जगत असतो. दृष्टीकोण बदलणार नसेल तर त्याचं आचरण बदलण्याची शक्यता कमीच असते. पहिल्यांदा दृष्टीकोण मग आचरण. जशी दृष्टी तशी सृष्टी.  हा निसर्गनियम आहे. त्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या तर्‍हेची आणि विक्षिप्त माणसं भेटत असतात.

विनम्रतेचा मार्ग

 जॉन रेंडाल्फ नावाचा एक श्रीमंत युवक आपल्या घोड्यावर स्वार हो ऊन आपल्या गावाकडे निघाला होता. त्या काळात रस्त्यांची अवस्था खूपच बिकट होती. त्यामुळे तो जमेल तसे सावकाश आपला गाव जवळ करत होता. प्रवास करता करता रात्री झाली. जॉन एका हॉटेलात उतरला. हॉटेलच्या मॅनेजरने अथितीचे स्वागत केले. मॅनेजरने उत्तम अशी जॉनसाठी भोजनाची व्यवस्था केली. त्याने जॉनला प्रवासातील वातावरण, रस्त्याची अवस्था आणि भेटलेल्या माणसांविषयी विचारलं. जॉनने मात्र कुठल्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही. काही एक न बोलता शांतपणे भोजन करून झोपण्यासाठी निघून गेला.
दुसर्‍यादिवशी जॉन आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला तेव्हा मॅनेजरने त्याला विचारले," तुम्ही कोणत्या रस्त्याने जाणारा आहात?"  या प्रश्नावर जॉन काहीसा रागात म्हणाला,"  तुमचे बिल चुकते केले आहे. आता मी कोणत्याही रस्त्याने जाऊ, त्याच्याशी तुमचा काहीही मतलब नाही."  यावर बिचारा मॅनेजर गप राहिला. जॉन आपला घोडा घेऊन पुढे निघाला.
थोडे पुढे गेल्यानंतर जॉनला दिसलं की, पुढे रस्त्याला दोन फाटे फुटले आहेत. तिथे कुठेच मार्गदर्शक फलक दिसत नव्हता. त्यामुळे त्याला कुठल्या रस्त्याने जावे याचा अंदाज येईना. जॉन पुन्हा माघारी परतला. मॅनेजरला विचारलं," मला कोणत्या रस्त्याने जावं लागेल?"
यावर मॅनेजर म्हणाला," मी तुम्हाला तेच सांगणार होतो. परंतु, आता तुम्ही कोणत्याही रस्त्याने जा. मला त्याच्याशी काही मतलब नाही." जॉनच्या लक्षात आले की,  आपण त्याच्याशी व्यवस्थित वागलो नाही. म्हणून तो नाराज झाला आहे.जॉन निमुटपणे माघारी परतला. त्यातला एक रस्ता त्याने निवडला. सहा तास चालल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आपण चुकीच्या मार्गाने आलो आहोत.आता  जॉन समजून चुकला की,  दुसर्‍यांशी विनम्रतेने वागले पाहिजे आणि त्यांच्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत.

मनाला लगाम

इतिहासातल्या तैमूरलंगला कोण ओळखत नाही. तो एक क्रूर, आततायी पण बुद्धिमान शासक होता. एका पायानं लंगडा असल्यानं त्याच्या नावापुढं 'लंग' हा शब्द लागलेला होता. तो दिसायला अत्यंत कुरूप होता, मात्र साहस आणि समजुतदारपणा त्याच्या अंगी ठासून भरलेला होता. तो नेहमी घोड्यावर स्वार असायचा. त्याने कित्येक प्रदेश जिंकत, लुटत आणि मिटवून टाकत काबूल, कंदहारहून हिंदुस्थानात आला. इथे त्याने मनसोक्त लुटमार केली. इथून परत जायला निघाला तेव्हा दिल्लीच्या शासकाने त्याला भेट म्हणून हत्ती पेश केला. तैमूर पहिल्यांदा हतीवर बसला. बसल्यावर लगेचच म्हणाला,' याची वेसन आता माझ्या हातात द्या. ' त्याला सांगितलं गेलं की, हा हत्ती आहे. याला वेसन असत नाही. तुम्ही मध्ये आरामशीर बसा. पुढे त्याचा माऊत बसेल, तोच छोट्याशा अंकुशद्वारा हत्तीवर नियंत्रण मिळवेल.
तैमूर तात्काळ हत्तीच्या पाठीवरून खाली उतरला. म्हणाला,' मला असली सवारी नको आहे, ज्याची वेसन माझ्याऐवजी कुणा दुसर्‍याच्या हातात असेल.' मनरुपी घोड्याचे वेसन्सुद्धा अशाप्रकारे आपल्या हातात्च ठेवायला हवे. त्याला काबूत ठेवा. अन्यथा मनरुपी घोड्यावर तुम्ही नाही तर तोच तुमच्यावर स्वार होईल. नियंत्रण अथवा लगाम आपल्या हाती असणं खूप आवश्यक आहे.
आजची सगळ्यात मोठी समस्या आहे ती, इमोशनल प्रॉब्लेमची! संवेग खूप प्रबळ आहे. त्यावर नियंत्रण आवश्यक आहे. शब्द,रूप, रस, गंध, स्पर्श या सगळ्या वस्तू लुभावणार्‍या आहेत. आपण यांचे दास बनून जातो. संयम बाळगत नाही. यांच्या मागणीला आपण चटकन होकार देऊन जातो. भाव  क्षणक्षणाला भटकवतात.  जोपर्यंत इंद्रियांवर , मनावर आणि आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण राहणार नाही, तोपर्यंत नैतीकतेच्या गोष्टी केवळ सांगून किंवा ऐकून आचरणात येणं अशक्य आहे.  सतत चौखूर उधळणार्‍या मनाला नियंत्रणात ठेवणे ही तारेवरची कसरत असली तरी न कंटाळता नियंत्रणासाठी प्रयत्नशील असण्यातच माणसाचे कल्याण आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. ..                                                                                       

एक होती बाहुली

 एक होता बाहुला आणि एक होती बाहुली. बाहुला दिवसभर लाकडे तोडायचा. ती विकून मग सायंकाळी घरी परतायचा.एक दिवस तो काम करून दमून्-भागून घरी आला. बाहुलीला म्हणाला,' बाहुली! मी आज खूप थकलोय. जरा पाणी गरम केलंस तर अंघोळ करीन म्हणतो. तेवढेच ताजेतवाने वाटेल.'
बाहुली म्हणाली, ' का नाही, आता करून देते. तिथे तो हंडा पडला आहे. तो आणा इकडे.'
बाहुल्याने हंडा उचलला आणि विचारलं,' आता काय करू?'
बाहुली बोलली,' आता जवळच्या  आडाचं त्यात पाणी भरून आणा.पाणी आणल्यानंतर हंडा चुलीवर ठेवा.'
बाहुल्यानं हंडा चुलीवर ठेवला. आणि म्हणाला,' आता काय करू?' त्यावर बाहुली म्हणाली, ' आता चुलीत जाळ घाला. पाणी आपोआप गरम होईल."
पाणी गरम झाल्यावर बाहुली म्हणाली," हंडा न्हाणीजवळ ठेवा. आणि मस्तपैकी अंघोळ करा."
बाहुल्याने हंडा ठेवला. कपडे काढले. अंग चोळून अंघोळ केली. अंग पुसत पुसत बाहुला म्हणाला," आता किती बरं वाटतं. अंग कसं ताजं तवानं, हलकं हलकं झालं आहे. तू रोज असंच पाणी गरम करून देत जा म्हणजे अशी मी रोज अंघोळ करत जाईन." '
बाहुली म्हणाली, " यात काय एवढं! तुम्हीच आळस करता. जा आता झोपा जा."  ..                              

स्वीस बँकेत खाते

चिंटूदादा डुकराच्या आकाराचा गल्ला घेऊन आपल्या आजोबांकडे गेला. त्यांच्या कानात जाऊन फुसफुसत म्हणाला, " आजोबा आजोबा, तुम्हाला माहित  का? स्वीस बँकेत खातं काढणं सोप्प आहे."
आजोबा आपल्या नातवाच्या गल्ल्याकडे निरखून पाहात म्हणाले," मग आपल्याला काय त्याचं?"
चिंटूदादा पुन्हा पफुसफुसला," तुम्ही माझंही खातं स्वीस बँकेत उघडून द्याना."
आजोबा हसत म्हणाले," का रे बाबा, तुला का स्वीस बँकेत खाते उघडण्याची गरज पडली?"
चिंटूदादा इकडे-तिकडे पाहात कोणी नसल्याचा अंदाज घेत आजोबांचे कान आपल्या तोंडाकडे खेचत हळूच म्हणाला, "तुम्हाला माहित नाही ? इन्कम टॅक्सवाले कधीही छापा ताकून माझा गल्ला जप्त करू शकतात्.सध्या वातावरण खूपच खराब आहे. म्हणूनच म्हणतो. लवकरात लवकर स्वेस बँकेत खातं उघडून द्या म्हणजे झझंट्च मिटून जाईल."
आजोबा टिव्हीवरचा  फालतू  कार्यक्रम पाहून बोर झाले होते. नातवाचं फुसफुसनं त्यांना मोठं मनोरंजक वाटलं.   त्यांनी त्याला मोठ्या प्रेमानं चिंटूला पुढ्यात ओढलं आणि म्हणाले, " पण चिंटू, इन्कमटॅक्सवाले तर ब्लॅकमनी ठेवणार्‍यांवरच छापा टाकतात. त्यांचे पैसे जप्त करतात. तुला रे कसली  काळजी. "
चिंटूदादा म्हणाला," तुम्ही कुणाला सांगू नका, माझ्या गल्ल्यातसुद्धा ब्लॅकमनी आहे. म्हणून तर मी टेन्शनमध्ये आहे."
आजोबा मोठे डोळे करत म्हणाले," तुला कुणी सांगितल?"
चिंटूदादा पुन्हा आजोबांचा कान आपल्याकडे खेचत म्हणाला," पप्पा-मम्मी रोज रात्री नोटा मोजताना म्हणतात. हे ब्लॅकमनी नसते तर आपलं जगणं मुश्किल झालं असतं. आपण उपाशी मेलो असतो. या गल्ल्यातसुद्धा त्या ब्लॅकमनीचेच पैसे आहेत."  
आजोबांच्या माथ्यावर आता चिंतेची लकेर उमटली. पण  ते सध्या चांगल्या मूडमध्ये होते. ते चिंटूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले," पण बाळा तुला तर हे व्हाईतमध्ये मिळत आहेत. त्यामुळे तुला कालजीचं काही कारण नाही. जी माणसं चोरीचा, गोलमालचा  पैसा बाळगतात, तीच माणसं हा पैसा स्वीस बँकेत ठेवतात. तुझा तर पैसा शुद्ध पॉकेटमनीचा आहे."
चिंर्टूदादाचा घरात  सगळ्यांमध्ये  अधिक विश्वास आजोबांवरच होता. म्हणूनच आपल्या गुप्त गोष्टी तो आजोबांनाच शेअर करत असे. तो पुन्हा आजोबांच्या कानात आपलं छोटंसं तोंड खुपसून म्हणाला," तुम्हाला आणखी काय काय सांगू. काही शुद्ध-बिद्ध काही नाही. मीसुद्धा कधी कधी पप्पा-मम्मीच्या पाकिटमधून पैसे चोरून यात टाकत असतो. शिवाय मम्मीची चुगली पप्पांना आणि पप्पांची मम्मीला न करण्यासाठी मी लाच घेतो. रामूसोबत माल आणायला बाजारात जातो. यात तो गोलमाल करतो. यातसुद्धा त्याच्याकडून मी कमिशन खतो. माझ्या मित्रांची कामे पप्पांकडून करून घेतो, यातली दलाली सोडत नाही. हेरा-फेरी करण्याचं माझं वय नाही पण वेळ आल्यावर तेही करीन. आणि आजोबा, हा सगळा ब्लॅकमनी मी या गल्ल्यात ठेवला आहे. मग सांगा, स्वीस बँकेत खातं खोलणं किती महत्त्वाचं आहे. "
आता आजोबांचे होश उडाले. त्यांना विश्वासच वाटत नव्हतं. पण चिंटू खरं सांगत होता. त्यांनी

चेहर्‍यावर नाराजीचा भाव आणत म्हणाले," चिंटू, चांगली मुलं, असं बोलत नसतात. तुला हे कुणी

शिकवलं? " पण नातू महाशय त्यांच्या बोलण्यावर कमालीचे नाराज झाले. विद्युत गतीनं त्याने

आजोबांच्या पुढ्यातून उडी मारली आणि म्हणाला,"मला माहित होतं, मला माहित होतं, तुमच्यासारख्या

खडूस म्हातार्‍याच्या बस की बात नाही. मी तर मम्मी-पप्पांनाच सांगेन स्वीस बँकेत खाते खोलायला. "

एवढे म्हणून चिंटूदादा आपल्या हातात डुकाराच्या आकाराचा गल्ला सांभाळत चालता झाला. आजोबा भावी पिढीकडे अवाक हो ऊन पाहात राहिले. .          

शेपटी नसलेला हत्ती

ए का जंगलात एक जांभळाचे झाड होते. त्यावर खुपशी माकडं राहत होती. माकडं दिवसभर काळी-काळी मोठी जांभळ खायची आणि रात्री झाडावरच झोपी जायची. एकदा एक हत्ती तिथे आला. काही वेळ तो झाडाच्या फांद्या मोडून खाऊ लागला; पण त्याचे पोट भरले. तेव्हा त्याला काय वाटले कोण जाणे. तो फांद्या तोडून मोडून फेकू लागला. नंतर तो आजूबाजूची छोटी छोटी झाडेही उखडून टाकू लागला.

आता माकडं खूप घाबरली. ते आपल्या सरदारकडे गेली. आणि म्हणाली, जर हत्तीने जांभळाच झाड उखडून टाकलं तर काय करायच. आपण कुठं राहायच. सरदार म्हणाला, तुम्ही घाबरू नका. मी आताच त्याचा बंदोबस्त करतो. मी जसे म्हणेल तसंच तुम्ही म्हणायचे. यानंतर माकडांचा सरदार एका उंच फांदीवर जाऊन बसला आणि मोठय़ाने म्हणाला, ‘अरे बघा शेपटी नसलेला हत्ती’. तशी माकडंही जोरजोरान तशीच म्हणू लागली. माकडांचे पाहून झाडावर बसलेली पाखरंही म्हणू लागली, अरे बघा शेपटी नसलेला हत्ती. हत्ती मात्र मागे वळून पाहू शकत नव्हता. कारण त्याची शेपटी छोटी होती. त्याला वाटलं खरोखरच आपल्याल्या शेपटी नाही. त्याला स्वत:ची लाज वाटू लागली. त्याने तेथून लगेच धूम ठोकली. सगळी माकडं आपल्या सरदारच्या हुशारीवर खुश झाले आणि पुन्हा गोड गोड जांभळ तोडून खाऊ लागले.

प्रेरणायी घटना

 दगड आणि स्त्री
श्रीलंकेत इंग्रजांचं राज्य होतं. तामिळी पंडित आरुमूग नावलर कादिर गामण्मुख मंदिराच्या बाहेर एका दगडावर आपल्या मित्रांसमवेत गप्पा मारण्यात दंग होते. एक इंग्रज त्यांच्या दिशेने आला. जवळ येऊन तो आरुमूग नावलरांना म्हणाला," आत काही लोक दगडाची पूजा करताहेत आणि तुम्ही मात्र चक्क दगडावर बसून चकाट्या पिटता आहात? "
काही दिवसांनी त्याच रस्त्यावरून तोच इंग्रज आपल्या कुटुंबासमवेत घोडागाडीतून चालला होता. त्याने नावलर यांना घोडागाडी थांबवली आणि शेजारी बसलेल्या आपल्या पत्नी आणि बहिणीची ओळख करून दिली.
आरुमूग नावलर त्या इंग्रजाला म्हणाले," दोन्ही स्त्रियाच आहेत. मग यातील एक तुमची पत्नी आणि एक बहीण हे कसे काय?" इंग्रज समजून चुकला. त्याने नावलरची माफी मागितली आणि आपला रस्ता धरला.                                                                                                          ..                                                                                                          - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
वेळ
साबरमती आश्रमात गांधीजींकडे कुठल्याशा गावचे काही लोक आले. त्यांनी गांधींजींना सभेसाठी आमंत्रित केले. बापू म्हणाले," ठीक आहे, उद्या  संध्याकाळी बरोबर पावणे चार वाजता तुम्ही मला न्यायला या. सरपंचाने सभेची वेळ चारची ठेवली होती. दुसर्‍यादिवशी सायंकाळचे पावणे चार वाजले. पण सरपंचांचा कुणी माणूस त्यांना न्यायला आला नाही. मग स्वतः बापूंनी सायकल घेतली आणि त्या गावाच्या दिशेने निघाले.
सरपंचांचा  माणूस बापूंना न्यायला आला, पण बापू त्याला भेटले नाहीत. तो परत गेला, तेव्हा गांधीजी लोकांमध्ये बसून त्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे त्याने पाहिले. भाषण संपल्यावर तो बापूंना भेटला. आपली झालेली चूक त्याने कबूल केली आणि त्यांची माफी मागितली. बापू त्याला म्हणाले, " वेळ खूप मौल्यवान आहे. आपल्याला वेळेचा सदुपयोग करून घेता आला पाहिजे."                                             - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
खरा राजा
 विजयी सिकंदरचे सैन्य एका जंगलातून माघारी परतत होते. सिकंदरसुद्धा त्यांच्या समवेत होता. वाटेत त्याने एका वृक्षाखाली एका बेफिकीर भिकार्‍याला पाहिले. तो भिकारी आपल्याच मस्तीत डफली वाजवत गाणे म्हणण्यात दंग झाल्;आ होता. असल्या दारिद्र्यग्रस्त परिस्थितीतही इतक्या धुंदपणे गाणे भिकार्‍याला भिकार्‍याला पाहून सिकंदरला मोठे आश्चर्य वाटले. तो थांबला. भिकार्‍यालात्याने त्याचे नाव विचारले.
भिकारी म्हणाला," मी राजा. " ऐकून चकित झालेल्या सिकंदरने पुन्हा विचारले, " तू कोणत्या देशाचा राजा आहेस? तुझा राजवाडा, तुझे ऐश्वर्य कुठं आहे?" तो बेफिकीर भिकारी तितक्याच बेदरकारपणे म्हणाला, " मनावर विजय मिळवलेला राजा. ही सारी दुनिया माझ्या  परमपित्या परमेश्वराच्या संपत्तीने भरून गेलेली आहे. असे असताना मी बापडा वेगळे असे टिचभर धन घेऊन काय करू? कुठे जाऊ?"
सिकंदरला त्याच्या बोलण्यामागचा गर्भितार्थ समजला. त्याला खर्‍या अर्थाने खर्‍या राजाचे पहिल्यांदा दर्शन घडले.                                                                                                                           - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

भाऊबीजेची ओवाळणी

गोष्ट खूप जुनी आहे. एका गावात रामधन नावाचा एक मोठा जमिनदार होता. त्याला चार मुलगे आणि एक मुलगी होती. यथावकाश मुलांचे विवाह झाले. जीवन काय असते, याची पक्की जाणीव रामधनला होती. त्यामुळे जसजशी मुलांची लग्ने होत गेली तसतशी त्यांची त्यांना वेगळी चूल मांडून दिली.शिवाय त्यांच्या हिश्श्यातील जमीनही देऊन टाकली. परंतु, त्यांना आपल्यापासून दूर केले नाही. आता मुले आपापल्या संसारात रमून गेली.  सगळ्यांसाठी आंगण एकच होते. अंगणात मुलांची  नातवंडं  प्रेमाने, जिव्हाळ्याने एकत्र खेळताना पाहून रामधनचं मन भरून यायचं. समाधान पावायचा.       अलिकडे रामधनला एक गोष्ट फार सतावत होती. ती होती, एक जमीनीचा तुकडा. त्याने त्याची काळजी हिरावून घेतली होती. हा तुकडा सगळ्यांना वाटून राहिलेला होता. त्याची वाटणी करता येण्याजोगी नव्हती. त्याची वाटणी करून काही उपयोग होणारही नव्हता. पण इकडे चारही मुलांची नजर त्या छोट्याशा तुकड्यावर होती. प्रत्येकजण त्याच्यावर आपला हक्क सांगत होता.
       रामधनला याचीच काळजी वाटत होती की, हा तुकडाच घराची शांती हिरावून घेईल की काय? जमिनीचा हा तुकडा द्यायचा तर कुणाला, हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर होता. या काळजीने त्याची प्रकृती बिघडत चालली. इकडे भावाभावांमध्ये या जमिनीवरून कुरबूर सुरू झाली होती. रामधनच्या घरावर ज्यांची ज्यांची वाईट नजर होती, त्यांनी त्यांनी  भावाभावांना स्वतंत्रपणे  गाठून भडकावत आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू लागली. त्यामुळे त्यांच्यात वितुष्ट  रुंदावत चालले.
      दिवाळीचा भाऊबीजेचा दिवस होता. चारही भावांची लाडकी , एकुलती एक धाकटी बहीण माधुरी ओवाळणीसाठी पतीसमवेत गावाकडे आली   होती.  पण वडिलांची खालावत चाललेली तब्येत पाहून ती काळजीत पडली. तिने आपल्या भावांमध्ये झालेला बदलही पाहिला. यावेळी तिला माहेरी आल्यावर पहिल्यासारखी मायेची , प्रेमाची अनुभूती आली नाही. आपल्या पतीशी तिने चर्चा केली. तिला चार दिवस माहेरी सोडून तो माघारी परतला.
     संध्याकाळी माधुरीने सर्व भावांना अंगणात बोलावून घेतले. वडिलांसमक्ष तिने जमिनीच्या तुकड्याचा विषय काढला. पण, त्यावर कुणीच काही बोलले नाही.  उलट विषयाला बगल देत तिला ओवाळणी कुठली द्यायची, हाच प्रश्न ते वारंवार विचारू  लागले.
माधुरी म्हणाली, " आज मी तुमच्याकडून माझ्या आवडीची भेटवस्तू तुमच्याकडून घेणार आहे. "
" बोल तुला कुठली वस्तू हवी आहे? आमच्या लाडक्या बहिणीला मागेल ती वस्तू देऊ." सर्वच भाऊ एकदम म्हणाले.
     माधुरीने तसे त्यांच्याकडून वचन घेतले.  माधुरी म्हणाली, " आपल्या गावात शाळा नाही. " थोरला भाऊ म्हणाला, " यात काय नवीव? आम्हाला तर माहितच आहे. मग पुढं...?"
    माधुरी म्हणाली, " बाबांजवळ जो जमिनीचा तुकडा आहे, तो तुमची इच्छा असल्यास शाळेसाठी पंचायतीला देऊन टाकू."
    माधुरीची ही गोष्ट ऐकून सगळेच भाऊ एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. माधुरी पुढे म्हणाली, " या शाळेत आपली मुले शिकतील. पुढं शिकून नोकरी  मिळवतील. याचा आपणा सर्वांनाच लाभ होईल."
    इतक्याच धाकटा भाऊ म्हणाला, " माझी काही हरकत नाही." मग सगळ्यांनीच होकारार्थी कौल देऊन टाकला. रामधनला तर अगदी गहिवरून आले. ज्या जमिनीच्या तुकड्यापायी  तो  सुख-चैन हिरावून बसला होता. त्या तुकड्याचा एका झटक्यात निकाल लागला. मनावरची चिंता एखाद्या पाखरासारखी भुर्रकन उडून गेली. रामधन म्हणाला,: पोरी, तू खूप हुशार निघालीस. माझी सारी काळजी एका झटक्यात मिटवलीस."
   दुसर्‍याच दिवशी सरपंच आणि अन्य पंचांना बोलावून घेऊन जमिनीचा तुकडा शाळेच्या नावाव्रर करून देण्यात आला. आता सगळे भाऊ गुण्यागोविंदाने राहू लागली.
   एका वर्षाने गावात शाळा सुरू झाली. शाळेला माधुरीचे नाव देण्यात आले. सुरुवातीला पाचवीपर्यंत वर्ग सुरू केले. आता उच्च माध्यमिक शाळाही सुरू आहे. आजूबाजूच्या गावातील मुलेही   इथे शिकतात. माधुरीने आपल्या भावाभावांमधल्या भांडणाचे मूळ उखडून टाकतानाच  एक चांगले, विधायक काम केले. आपल्याही आयुष्यात अशी संकटे येत असतात. पण आपण पैसा, जमीन्-जुमला यापेक्षा आपल्या माणसांना जवळ करायला हवे. होय ना ?    
                                                                                    

गुरुजींचा मंत्र

एकदा एक शेठ आपल्या मुलाच्या वाईट सवयींना  पार वैतागून गेला होता.  आपल्या मुलाच्या  सवयी लवकर सोडवल्या नाहीत तर खूप उशीर होऊन जाईल.यासाठी  काही तरी केले पाहिजे, असा  त्याने विचार केला.त्याने गावातील एका आध्यात्मिक गुरूजींशी याबाबत बोलणी केली. गुरुजी म्हणाले, 'उद्या त्याला माझ्याकडे पाठवून द्या.'
दुसर्‍यादिवशी शेठने आपल्या मुलाला गुरुजींकडे पाठवून दिले. मुलगा आल्यावर  गुरुजी त्याला म्हणाले,' आता माझी फिरायची वेळ झाली आहे. चल ,दोघेही मिळून  काही अंतर जाऊन फिरून येऊ.'  दोघे जवळच्या वनात फिरायला गेले. पावसाळ्याचे दिवस होते. आजूबाजूला नुकतीच काही लता- वेली, वनस्पती उगवल्या होत्या. गुरुजींनी त्याला एक छोटेसे रोप उपटून आणायला सांगितले. त्याने लागलीच एक रोप उपटून गुरुजींसमोर धरले.
काही अंतर गेल्यावर गुरुजी एका मोठ्या  रोपाकडे बोट करत म्हणाले, आता ते रोप उखडून दाखव. मुलाने थोडा प्रयत्न केला आणि रोप उपटले. ते  गुरुजींपुढे धरले. गुरुजी म्हणाले,' खूप छान.'  मुलाला वाटले, गुरुजींनी सांगितलेली कामे आपण व्यवस्थितरित्या केली आहेत. त्यालाही समाधान वाटले. 
 दोघेही  चालत होते. पुढे काही अंतर गेल्यावर गुरुजी म्हणाले, 'बाळ, ती वेल उपटून दाखव.'  आता त्याला मघापेक्षा आणखी थोडी मेहनत घ्यावी लागली,  पण त्याने वेल उखडून काढण्यात यश मिळवले.  त्याच्या कपाळावर घाम  गोळा  झाला होता.  दमही लागला होता. गुरुजी म्हाणाले, ' व्वा ! हेही काम तू केलेस तर...'
दोघेही पुढे निघाले. काही अंतरावर  एक आंब्याचे झाड होते. गुरुजी म्हणाले, ' आता या  झाडाला  उखडून दाखव.'  मुलगा म्हणाला,' गुरुजी, हे कसे शक्य आहे ?  मला झाड हलणारसुद्धा नाही. '  गुरुजी म्हणाले,'  लक्षात ठेव, वाईट सवयीसुद्धा अशाच असतात.  सवयींची  प्रारंभीची अवस्था  असेल तर त्या  उखडून टाकता येतात .  पण त्या कमालीच्या   वाढल्या असतील  तर मात्र त्याच्यापासून सुटका करून घेणे खूप  कठीण होऊन  जाते.  म्हणून सांगतो, तुझ्या वाईट सवयी आताच सोडवल्यास तुझ्या हिताचे आहे.'  मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने सवयी सोडण्याचा निर्धार केला. दुसर्‍यादिवसापासूनच त्याच्या वर्तणुकीत फरक दिसून आला.  शेठने गुरुजींना मनापासून धन्यवाद दिले.
तात्पर्यः वाईट सवयींपासून लवकर सुटका करून घ्यावी. एकदा का सवय लागून राहिली,  तर मात्र खूप मोठा त्रास होतो  

Sunday 19 February 2012

गुप्त अध्यात्म

एक राजा होता. त्याची राणी मोठी धार्मिक विचारसरणीची होती. तिचा बहुतेक वेळ परमेश्वराच्या भक्तीत जायचा. पूजापाठ तिच्या दिनक्रमातील प्रमुख अंग होते. तिला सर्व काही मिळालं होतं. कशाचीही कमतरता नव्हती. तिचा पती राजासुद्धा प्रेमळ होता. प्रजानुरागी, न्यायप्रिय राजा म्हणून त्याची ख्याती होती. राजा आपल्या कार्यात निपुण होता. फक्त राजा आस्तिक होता, याचंच तिला एकमेव दु:ख होतं. राजाला कुणी पूजापाठ करताना पाहिलं नव्हतं. राणीला याचीच मोठी खंत वाटत होती.
 एका रात्री तिसर्‍या प्रहरी राणीला अचानक जाग आली. तिनं पाहिलं की , महाराज झोपेत ' नारायण नारायण' असे काहीसे पुटपुटताहेत. ते पाहून तिला अत्यानंद झाला. महाराज झोपेत का होईना देवाचे नामस्मरण करत आहेत, ते पाहून तिने देवाचे आभार मानले. दुसर्‍यादिवशी तिने मोठा उत्सव साजरा केला. प्रजेला भोजनाचे निमंत्रण दिले. हा सगळा थाट पाहून राजाने विचारले, ' हा थाटमाट कशाचा? कशासाठी इतका मोठा सोहळा?'
राणी म्हणाली, ' मी काल रात्री तुम्हाला परमेश्वराचे नामस्मरण करताना पाहिले. माझा आनंड गगनात मावेनासा झाला आहे.'
हे ऐकून राजा चमकला. तो पुरता नाराज झाला. त्याचे आयुष्यभर चाललेले गुप्त अध्यात्म उघड्यावर पडले होते. भक्ती म्हणजे काही केवळ दिखाव्याची चीज नाही. ती आंतरिक ओढ आहे. मन निरंतर परमेश्वराच्या चरणी अचल राहावं, पण हात सतत कर्मासाठी झटायला हवेत, अशा विचाराच्या राजाला आता दु:ख वाटत होतं.

खेचरानं धडा शिकवला

 जपानमधील अकानावा शहराजवळील नरसो  गावात सुतोमो   नावाचा एक शेतकरी राहत होता. तो खूप कष्टाळू, मेहनती होता. फालतू गोष्टींपेक्षा तो सतत आपल्या कामात व्यस्त असे. सुतोमोच्या कुटुंबात त्याच्याशिवाय आई-वडील, लहान भाऊ आणि त्याची पत्नी सुनारी होती. सुतोमो जितका शांत, मनमिळावू होता, तितकीच विपरीत ती भांडकुदळ, वाचाळ आणि तुसड्या स्वभावाची होती.सुतोमो आहे त्यात समाधान मानणारा तर सुनारी असमाधानी होती.
सुतोमोला सतत टाकून बोलायची. मोकळ्या वेळेत शेजारच्या महिलांनाही त्यांच्या नवर्‍याविरुद्ध भडकवायची. त्यांना नवर्‍याला आणण्यास असमर्थ असलेल्या वस्तू मागवायला लावायची.
सुतोमोकडे काही जनावरे होती. त्यात एक खेचरसुद्धा होते. तो धान्याची गाडी ओढायचा. सुतोमो सगळ्यांची मोठी काळजी घेत असे. तो त्याच्या कामातील त्यांचे महत्त्व जाणून होता. या उलट सुनारीचा स्वभाव. तिला जनावरांविषयी अजिबात आस्था नव्हती. तिला जेव्हा कधी चारा-पाणी करायला सांगितले जाई, तेव्हा ती सारे अर्धवट्च करी. त्यामुळे ती जनावरेसुद्धा तिचा तिटकारा करत. 
एकदा सुतोमोला शेजारच्या गावी जायचं होतं. तिथे त्याला दोन्-तीन दिवस थांबणं भाग होतं. जाताना त्याने सुनारीला बजावलं. जनावरांची काळजी घेण्याविषयी सुनावलं. पण नेहमीसारखं तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्या खाण्या-पिण्याची वेळ टळून गेली तरी तिनं त्याची पर्वा केली नाही. खेचर भूकेने व्याकूळ हो ऊन जोरजोराने ओरडू लागले. पण सुनारी मात्र बिनधास्त लोळत पडली होती.
खेचराच्या सततच्या ओरडण्याने तिची झोप उडाली. ती संतापली. त्याच तिरिमिरीत उठली. चुलीतले जळते लाकूड घेऊन खेचराजवळ गेली. त्याने त्याची चांगलीच पाठ शेकवली. खेचर आधीच भूकेलेला होता. त्यात जळत्या लाकडाचा प्रसाद. तो अत्यंत संतापला. त्याने सुनारीकडे पाठ केली आणि एक जोराची लाथ झाडली. त्या लाथेने सुनारी दूर जाऊन पडली. तिचे डोके दगडावर आपटून   जागीच गतप्राण झाली.
बायकोच्या मृत्यूची वार्ता ऐकून सुतोमो गावी परतला. घरासमोर मोठी गर्दी जमली होती. अख्खा गाव तिथे जमला होता. तेथून एक प्रवाशी चालला होता. इतकी मोठी गर्दी पाहून त्याने त्यातल्या एकाला विचारले, ' ही महिला इतकी लोकप्रिय होती?'
'कशाची लोकप्रियता घेऊन बसलात? या बयेनं सार्‍या गावातल्या बायकांना बिघडवलं होतं. या खेचरानं तिला धडा शिकवला. आता आपल्या बायकांना धडा शिकवण्यासाठी त्याच्या खरेदीसाठी ही गर्दी जमली आहे. त्यासाठी मोठी बोली लावली जात आहे', ती व्यक्ती म्हणाली. हे ऐकून तो प्रवाशी चकीत झाला. शेजारी उभा असलेला सुतोमो तर त्यांची बातचित ऐकून स्तंभीतच झाला.                                             

लागेल धन तर देईल गौरीसेन

बंगालमध्ये एक म्हण चांगली प्रसिद्ध आहे, ती म्हणजे' लागेल धन तर देईल गौरीसेन". ऐकणारा पहिल्यांदा बुचकाळ्यात पडतो. कारण पैशाचा आणि गौरीसेनचा संबंधच काय? पण या मागची कहानी ऐकल्यावर मात्र सारा उलगडा होऊन जातो. तर त्यासंदर्भातीलच ही कथा.
खूप वर्षाम्पूर्वी बंगालमधल्या हुगली जिल्ह्यात हरिकृष्ण मुरलीधर नावाची एक व्यक्ती राहत होती. त्याला एक मुलगा होता, गौरीसेन. वडिलांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावर टाकून त्याला कामधंद्याला लागावे लागले होते. आपला स्वतंत्र व्यवसाय करावा इतकीही त्याची ऐपत नव्हती. पण बुद्धीने तल्लख आणि स्वभावाने सत्यवचनी होता. म्हणूनच त्याला लहान वयातच कोलकात्याच्या वैष्णव शेठने आपल्या व्यवसायात भागिदार बनविले होते.
कोलकाता आणि हुगलीमधून माल गोळा करायचा आणि तो मेदिनीपूरला रवाना करायचा, हाच त्याचा व्यवसाय. मेदिनीपूरमध्ये भैरवदत्त नावाचा एजंट होता. तो माल घ्यायचा आणि अन्य एजंटांना विकायचा. भैरवदत्त मोठा प्रामिक होता.
एकदाची गोष्ट. गौरीसेनने सात नौका भरून मालाच्या पेट्या पाठवल्या. नौका मेदिनापूरच्या किनारी लागल्या. भैरवदत्ताने नेहमीप्रमाणे मालाची    खात्री करण्यासाठी पेट्या उघदल्या तर त्याला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. त्यात मालाऐवजी चांदी होती. सगळ्या पेट्या चांदीच्या दागिन्यांनी भरलेल्या होत्या. मात्र त्याने चांदी मागवली नसल्याने नौका माघारी पाठवून दिल्या.
इकडे रात्री गौरीसेनच्या स्वप्नात त्याच्या नौका माघारी येत असल्याचे दिसले. त्यातल्या पेट्या चांदीने भरल्या असल्याचे त्याला दिसले. सकाळी खात्री करण्यासाठी तो समुद्र किनारी पोहचला. पाहतो तर खरोखरच नौका माघारी परतल्या होत्या. पेट्या चांदीने भरल्या होत्या. चांदी पाहून त्याची शुद्धच हरपली. इतकी चांदी पहून कुणाचे होश उडणार नाहीत? पण गौरीसेन भानावर आला. इश्वरीप्रसाद समजून त्याचा स्वीकार केला.
यानंतर गौरीसेनमध्ये कमालीचे परिवर्तन झाले. पैसा हाती आल्यावर माणसे अहंकाराने पेटून उठतात. पण गौरीसेन त्याविपरित कमालीचा विनयशील बनला. त्याचा देवावरचा विश्वास आणखी दृढ झाला. पाप्-पुण्याबाबत अधिकच सतर्क झाला. तो आपल्या साथीदारांना वेळोवेळी मदत करू लागला. इतकेच नव्हे तर समाजोपयोगी अनेक कामे त्याने केली. किती मुलांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. कित्येक मुलींचे विवाह त्याने केले. याचकाला तो सतत मदत करीत राहिला. यथावकाश गौरीसेन गरजवंतांचा देवता बनला. आर्थिक अडचण आली की, हमखास गौरीसेनकडे लोक जात. त्याचे काम हो ऊन जाई. सगळ्यांचा विश्वास होता की, त्याच्याकडील धनाचे भांडार कधीच संपणार नाही. मदत म्हटली की, गौरीसेन , असे सर्वांच्या मुखी त्याचे नाव होते. पुढे मनात वसलेल्या भावनेला म्हणीचे स्वरूप प्राप्त झाले.
तीनशे वर्षांपूर्वीचा गौरीसेन आजही विसरला गेला नाही. पैशामुळे कुणाचे काम अडले तर त्याला धीर देत म्हणतात, ' घाबएऊ नकोस. लागेल धन तर देईल गौरीसेन. म्हणजे चांगल्या कामाला कुणीतरी गौरीसेनच्या रुपात हातभार लावेल आणि काम होऊन जाईल.  - मच्छिंद्र ऐनापुरे

हिंसा वर्ज्य आहे

   एकदा स्वामी रामनरेशाचार्य भक्तांना सांगत होते,  आमच्या मठात एक आंब्याचे झाड होते. मठाचे व्यवस्थापक मला म्हणाले, " मी आंब्याचे झाड तोडायला येईन. तेव्हा तुम्ही मला आडवायचं. " मी म्हणालो, " तुम्ही असे का म्हणता ?" ते म्हणाले," या आंब्याच्या झाडाला भीती घालायची. तीन्-चार वर्षे झाली झाड फळच देईना झाले आहे."
     दुसर्‍यादिवशी ते कुर्‍हाड घेऊन आले. म्हणाले," आता तोदतोच याला. काही उपयोगाचे नाही हे झाड. किती वर्षे झाली अजिबात फळच देत नाही. काय करायचे याला ठेऊन?" मी त्यांना रोखलं. "अहो, तोडू नका त्याला. एक वेळ संधी द्या त्याला."  असा आमचा नाटकी संवाद घडला. पण आश्चर्य असं की पुढच्या वर्षी झाडाला आंबेच आंबे लगडले."
     झाडांमध्येसुद्धा प्राण असतो. संवेदना असते. तेही घाबरते. त्याच्यातही आत्मा वास करत असतो. ही काही आजची गोष्ट नाही. आपल्याला सांगितलं जातं की अमूक एक काम केलं की पुढच्या जन्मी या वृक्षाचा जन्म मिळतो. तर तमुक काम केलं की त्या वृक्षाचा जन्म मिळतो.वृक्ष तोडण्याच्या कृतीलाही पाप समजलं जातं. आजपर्यंत या दुनियेतला वृक्ष तोडणारा कुठलाही माणूस मोठा झाला नाही. लाकडे तोडून काही दिवस पैसेवाले होतात. पण ते फार काळ काही टिकत नाही. कारण जिवंत वृक्षावर जो कोणी कुर्‍हाड चालवेल, त्याचे दिवस भरलेच म्हणून समजा. मारण्याचा अधिकार फक्त परमेश्वराला आहे. कारण त्यानेच त्याला बनवले आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी मारेल तर त्याला शिक्षा होईल. एखाद्याला    वाणीनेही मारले जाऊ शकत नाही. मनाचाही प्रहार केला जाऊ शकत नाही. तर मग शरीराची गोष्टच सोडा.                     

आंबट आंबा

मेवाडचा महाराणा आपल्या एका नोकरास नेहमी सोबत ठेवत असे. मग ते युद्धाचे मैदान असो अथवा परमेश्वराचे मंदिर. एकदा महाराणा एकलिंगजी देवाच्या दर्शनाला गेले. सोबत नोकर होताच. दर्शन झाल्यावर जरा पाय मोकळे करण्यासाठी दोघे तलावाकाठी फिरायला आले. तिथे त्यांना एका झाडाला खूप आंबे लगडलेले दिसले. त्यांनी त्यातला एक आंबा तोडला. त्याचे चार भाग केले. त्यातला एक भाग नोकराला देत म्हणाले," खाऊन पहा आणि चव कशी आहे ती  सांग मला.'
नोकराने आंबा खाल्ला नी म्हणाला, " खूप गोड आहे, महाराज. आपल्याला एक विनंती आहे, महाराज. मला आणखी एक फोड देण्यात यावी."  महाराजांनी त्याला आणखी एक आंब्याची फोड दिली. तीही खाऊन नोकर म्हणाला, " व्वा काय स्वाद आहे, अगदी अमृतासमान ! महाराजांनी आणखी एक फोड देणयाची कृपा करावी."
महाराजांनी त्याला तिसरी फोडही दिली. ते खाताच नोकर म्हणाला," काय मधुर आहे. व्वा, मजा आली. महाराज, ही राहिलेलीही  फोड देऊन माझ्यावर कृपा करावी." आता मात्र महाराणांना संताप आला. ते म्हणाले," तुला लाज वाटत नाही ? तुला सर्वकाही पहिल्यांदा मिळतं. तरीही तुझा हव्यास संपला नाही. आता ही फोड अजिबात मिळणार नाही." असे म्हणतच राजाने राहिलेली आंब्याची फोड दाताखाली धरली. आणि काय आश्चर्य ! त्यांनी ती लगेच थुंकून टाकली. " बाप रे! इतकी आंबट. आणि तू तर गोड आहे म्हणालास ? आणि अमृततुल्य म्हणत खाऊनही टाकल्यास. असे का म्हणालास ?"
नोकर म्हणाला," महाराज, आयुष्यभर तुम्ही मला गोड गोड आंबेच देत आला आहात. आज आंबट आंबा निघाला म्हणून कसे म्हणू की हा आंबट आहे. असं म्हणणं म्हणजे कृतघ्नपणा नव्हे काय ?" महाराजांनी त्याला गळ्याशी घेतले.                                                        - मच्छिंद्र ऐनापुरे

महाल आणि धर्मशाळा

एक संन्यासी राजाच्या महालाखाली येऊन झोपला. पाहरेकर्‍यांनी त्याला तेथून हटविण्याचा खूप प्रयत्न केला पण, त्याने त्यांना अजिबात जुमानले नाही. पाय पसरून स्वस्थ झोपून राहिला.
पाहरेकर्‍यांनी त्याला सांगितले, ‘हा राजाचा महाल आहे. तुला आराम करायचा असेल तर धर्मशाळेत जा."  संन्यासी म्हणाला," हा महाल नाही. धर्मशाळा आहे. मी इथेच विश्रांती करणार." असाच काही काळ वाद होत राहिला. पण संन्यासी आपल्या मतावर ठाम राहिला. शेवटी संन्यासी  ऐकत नाही म्हटल्यावर त्याची बंदीखान्यात रवानगी करण्यात आली.
दुसर्‍यादिवशी दरबारात त्याला राजासमोर उभे करण्यात आले. राजा म्हणाला, " एका संन्यासानं खोटं बोलणं उचित नाही. तुला माहित नाही काय कि हा माझा महाल आहे तो ? यास तू धर्मशाळा कसे म्हणतोस ?"
" राजा, हा महाल नाही, धर्मशाळा आहे." संन्यासी.
राजा आश्चर्यात बुडाला. राजा काही बोललाच नाही. संन्याशानेच विचारले," महाल आणि धर्मशाळा यात फरक काय?"
" महाल कायमच्या निवासासाठी असतो तर धर्मशाळा काही काळाच्या विश्रांतीसाठी." राजा उत्तरला.
" राजा, तू ज्या महालात राहतोस ,तो कुणी बनवला ?"
" माझ्या वडिलांनी- महाराजांनी"
" ते या महालात किती वर्षे राहिले ?"
 " पाच वर्षे."
"त्यानंतर...?"
" आता मी राहतो आहे."
" तू या महालात कायम राहणार आहेस काय ?"
हे वाक्य ऐकल्यावर मात्र राजाचे डोळे उघडले. त्याने विचार केला, संन्यासी म्हणतो ते बरोबरच आहे. हे जीवन म्हणजे काही दिवसांचा प्रवासच होय. आणि ज्याला मी आजपर्यंत महाल म्हणत होतो, ती तर विश्रांतीची एक धर्मशाळाच आहे.                                        - मच्छिंद्र ऐनापुरे,

राजकन्या आणि साप

राजा शिवशक्तीला एकुलता एक राजपुत्र होता. त्याच्या पोटात एक साप वास करीत होता. यामुळे तो अत्यंत कमजोर बनला होता. अनेक वैद्यांनी त्याच्यावर उपचार केले पण काही उपयोग झाला नाही. निराश होऊन त्याने घर सोडले. इकडे-तिकडे भटकत भटकत तो दुसर्‍या राज्यात पोहचला. तिथे तो भिक मागून आपले पोट भरू लागला आनि एका मंदिरात  दिवस काढू लागला.
     या राज्याच्या राजाचे नाव बली होते. त्याला दोन राजकन्या होत्या. त्या रोज सकाळी राजाच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायच्या. पहिली नमस्कार करून म्हणायची," महाराजांचा विजय असो, आपला आशीर्वाद असावा. आपल्या आशीर्वादाने सुख-वैभव मिळू दे."  धाकटी  म्हणायची," महाराज, आपल्याला आपल्या कर्माची फळे मिळू देत."
    राजा म्हणायचा," माझ्या कर्मामुळेच तुम्ही इतक्या सुखात राहता आहात." धाकटी  राजकन्या म्हणायची, " नाही महाराज, हे माझ्या कर्माचे फळ आहे." राजा धाकटीच्या बोलण्याने नाराज व्हायचा.
    एक दिवस राजाने प्रधानाला आदेश दिला, " कडवे बोल बोलणार्‍या ह्या माझ्या धा़कट्या राजकन्येचा
 विवाह एखाद्या भिकार्‍याशी लावून द्या. भोगू देत तिला तिच्या कर्माची  फळे !"
    प्रधानाने तिचा विवाह मंदिरात राहणार्‍या भिकारी राजपुत्राशी लावून दिला. राजकन्या अगदी प्रसन्न मनाने आपल्या पतीची सेवा करू लागली. काही दिवसांनी ती आपल्या पतीसह परराज्यात निघून गेली. तिथे एका सरोवराच्या काठाला झोपडी बांधून राहू लागली.
    एक दिवस राजपुत्र-पतीस घराची राखण करण्यास सांगून घरसामान आणण्यासाठी स्वतः नगरात गेली. इकडे राजपुत्र एका दगडावर डोके ठेऊन स्वस्थ झोपला होता. त्याच्या पोटातला साप बाहेर आला. इतक्यात तिथे असणार्‍या बिळातला एक सापही  बाहेर आला. तो पोटात वास करणार्‍या सापाला म्हणाला," किती दृष्ट आहेस तू? त्या बिचार्‍या राजपुत्राला किती छळतोस. त्याला जुन्या राईची कांजी पाजल्यास तू तात्काळ मरशील. हे कुणाला ठाऊक नाही असं तुला वाटतं का ?"
     पोटातल्या सापाला राग आला. " तू काय स्वतःला साळसूद समजतोस? स्वतःच बघ. बिळात सोन्याच्या नाण्यांची दोन हंडे लपवून ठेवला आहेस आणि मला शहाणपणा शिकवतोस. बिळात उखळते तेल किंवा पाणी ओतल्यास भाजून मरून जाशील." राजकन्या परतली होती. ती लपून त्यांचे बोलणे ऐकत होती. तिने त्यांनीच सुचवलेल्या उपायांचा अंमल करून दोघांचाही वध केला. बिळातले हंडे काढून घेऊन ती आपल्या राज्यात आली आणि पतीसोबत सुखा-समाधानात राहू लागली. 
                                                              - मच्छिंद्र ऐनापुरे

एक दिवसाचा राजा

एका गुरूकुलात राजपुत्रासोबत  व्यापार्‍यांची दोन मुलंही अध्ययन करीत होती. अध्ययनाच्या शेवटच्या वर्षी व्यापारीपुत्र राजपुत्रापासून लांब लांब राहू लागले. राजपुत्राने त्यांना कारण विचारले. त्यावर शेठपुत्र म्हणाले,  'तू राजपुत्र आहेस. आज ना उद्या राजा  होशील. आम्ही मात्र व्यापारीच होऊ आणि आपले पोट भरत राहू. कुठे तू आणि कुठे आम्ही. तुझ्यापासून लांब असलेलंच बरं.'   राजपुत्र म्हणाला, ' तुम्ही माझे मित्र आहात. मैत्री राहिली तर भविष्यात कधी ना कधी मी तुम्हाला एक दिवसाचा राजा बनवीन.' ऐकून दोघा मित्रांना खूप आनंद झाला.  अध्ययन पूर्ण झाल्यावर सगळे आपापल्या घरी परतले.
काही काळ लोटला. राजपुत्र राजा बनला. तिकडे शेठपुत्रसुद्धा आपापल्या नगरीतले  शेठ म्हणून ओळखले जाऊ लागले. दिवस जात होते. एक दिवस पहिल्या शेठपुत्राला व्यापारात मोठा तोटा झाला. कर्ज देणार्‍यांनी तगादा लावला. त्याला आपल्या राजपुत्र मित्राची आठवण झाली. तो त्याच्याकडे गेला. आणि आपल्या वचनाची आठवण करून दिली. राजा म्हणाला,' ठीक आहे, आज दिवसभर तू राज्यकारभार सांभाळ.'
शेठपुत्राने पहिल्यांदा कोशाध्यक्षास बोलावणे पाठवले.  शेठपुत्रास  कर्ज दिलेल्या लोकांनाही बोलावण्यात आले. कोषाध्यक्षास राज खजिन्यातून व्याजासह मुद्दल देण्यास सांगितले. त्यानुसार देणेकर्‍यांचे सारे पैसे चुकते करण्यात आले. सगळ्यांना आनंद झाला. काही धन त्याने परोपकारात घालवले. घोडागाडी भरून सोने-चांदी आपल्या घरी पाठवून सुखी आणि संपन्न झाला.
काही दिवसांनी दुसर्‍या व्यापारीपुत्राचा धंदाही डळमळीत होऊ लागला. तोसुद्धा आपल्या राजपुत्र मित्राकडे गेला. वचनाची आठवण करून दिली. राजा म्हणाला, ' उद्या या नगरीचा राजा तू हो.' शेठपुत्र हर्षोल्हासित झाला. दुसर्‍यादिवशी सकाळी उठल्यावर त्याने सेवकांकरवी दाढी केस बनवले. मालिश करवून घेतली. अंघोळ केली. राजवस्त्रे नेसली. नंतर भोजनखान्यात राजेशाही भोजनावर मनसोक्त ताव मारला. यामुळे त्याचे शरीर जड झाले. त्याला झोप येऊ लागली.त्याने विचार केला, थोडा वेळ आराम करावा आणि मग राजदरबारात जाऊन कारभार पाहावा. एक दिवसाचा राजा राजमाहालात जाऊन झोपला. जाग आली तेव्हा सूर्य मावळत होता. तो घाबरला. पण आता त्याच्या हातात काही राहिले नव्हते. कारण त्याची वेळ संपली होती. तो जसा आला , तसा राजमाहालातून बाहेर पडला. त्याने वेळेचे महत्त्व जाणले नाही. ( राजस्थानी लोककथा)
                                                         - मच्छिंद्र ऐनापुरे,

एक होती तारका

गोष्ट प्राचीन काळची आहे. एका गावात एक वृद्ध जोडपे राहात होते. त्यांना मूलबाळ नव्हते. पण तरीही ते कुणाला दोष न देता दिवस आनंदात  घालवत  होते.
एका दिवसाची संध्याकाळ. दोघेही शेतातून घरी परतत होते. वाटेत त्यांना एक लाकडी पेटी दिसली. त्यांनी काही वेळ कसलासा विचार केला आणि पेटी उचलून घरी आणली. त्याचे कुलूप फोडून  ती उघडली. आणि पाहतात तर काय , आत सुंदर, गोंडस चिमुरडी  मुलगी शांत झोपली होती. तिला पाहताच दोघांना खूप खूप आनंद  झाला. जणू काही ही सुंदर मुलगी परमेश्वरानेच पाठवली आहे असे त्यांना वाटले. तसे समजूनच देवाचे आभार मानून त्यांनी तिचा सांभाळ करण्याचे ठरवले.
ते तिच्या संगोपनात गर्क झाले. तिला अगदी फुलासारखे जपू लागले. दिवस जात होते, तशी ती मोठी होत होती. ती अधिकच देखणी दिसू लागली. ती त्या दोघा वृद्धांनाच माता-पिता समजू लागली. त्यांच्या प्रत्येक आज्ञेत राहू लागली. शिवाय त्यांची काळजी करू लागली. त्यांना कामात मदत  करू लागली. दोघांनी तिचे नाव तारका ठेवले.
वयात आली तेव्हा तर ती एखाद्या राजकन्येहून अधिक सुंदर दिसू लागली. तिच्या सौंदर्याची कीर्ती सर्व दूर पसरली. तिला मागणी घालण्यासाठी लांब लांबचे राजपुत्र, राजे- महाराजे येऊ लागले.  तिच्या सौंदर्यावर भाळून , तिचा विरह सहन न होऊन कित्येक वेडेपिसे झाले. मात्र तिने कुणालाच दाद दिली नाही. सगळ्यांना तिने स्पष्ट नकार दिला.
एक दिवस त्या राज्याचा सम्राट स्वतः तिला पाहायला आला. तिच्या सौंदर्यावर तोही भाळला. त्याने लगेच तिला लग्नाची मागणी घातली. पण तारकाने त्यालाही नकार दिला. त्याने तिला पळवून नेण्याची धमकी दिली. त्यावर तारका त्याला म्हणाली, ' माझा पती चंद्र आहे. त्या सुधारकाची मी राणी आहे. माझे लग्न त्याच्याशी झाले आहे. मी लवकरच त्याच्याकडे आकाशात परतणार आहे. त्यामुळे राजा अविचार सोडून दे.'
भल्या भल्या राजा- महाराजांना आपले मांडलिकत्व पत्करायला लावणार्‍या सम्राटाचा अहंकार दुखावला. त्याला   तिच्या नकाराचा संताप आला.  त्याने गर्जना केली, ' तू चंद्राकडे जातेसच कशी ते मी पाहतो.' त्याने सिपायांना आदेश दिला. ' तारका आणि त्या चंद्रावर बारीक नजर ठेवा. पळून चालली तर तिला ठार मारा. '
सम्राटाच्या सिपायांनी जागता पाहारा ठेवला. दुसर्‍यादिवशी अंधार होताच, आकाशात ढगांनी गर्दी केली. जोराचा वारा सुटला. लोक सैरावैरा धावू लागले. इतक्यात तारका दिशेने आकाशातून प्रचंड मोठा एक प्रकाशाचा गोळा आला आणि काही क्षणात तारकाला वरती घेऊन गेला.  तिच्यासोबत वृद्ध माता-पिता गेले. शेवटी सम्राटाचा अहंकार आणि क्रोध व्यर्थ गेले. ( जपानी लोककथा)