Sunday 19 February 2012

... आणि शाळा गळायची थांबली

दरिकोणुरातल्या लक्षीला ओळखत नाही, असा इसम शोधूनही सापडायचा नाही. लक्षी मोठी हुशार, खोडकर आणि बडबडी होती. ती सतत कुणाशी ना कुणाशी , काही ना काही बोलत राहायची. अख्खे गाव तिला आणि ती अख्ख्या गावाला ओळखायची. गावात  एक जिल्हा परिषदेची शाळा होती. त्या अख्ख्या शाळेतही लक्षीची चलती होती. ती अभ्यासातही सगळ्यांच्या पुढं नंबर मारायची.
तिच्या बडबड्या स्वभावाची आईला मात्र चिंता वाटायची. ती नेहमी तिला समजावून सांगायची, " अगं लक्षे, जरा कमी बोलत जा. लोक काय विचार करत  असतील?"  लक्षी म्हणायची , " मला काय त्याचं ? ज्यांना विचार करायचाय त्यानं खुशाल विचारकरत बसावं...."
आई म्हणायची, " अगं अशानं उद्या तुझ्याशी कोण लग्न करील ? " मग लक्षी फाडकन म्हणायची,              " मुक्या-बहिर्‍याशी लग्न करीन , तुला काय त्याच्याशी ...?" तिच्या आईची बोलतीच बंद व्हायची. लक्षीकडं सगळ्या प्रश्नांची उत्तरं हजर असायची.
  पावसाळ्यात लक्षीच्या शाळेला सारखी सुट्टी असायची. तिची शाळा फार गळायची. पाणी पाणी व्हायचं. शाळेत बसायला जागाच नसायची. अशा वेळेला वाटायचं, तिच्याजवळ खूप खूप मोठी छत्री असती तर ती शाळेवर धरली असती. मग सगळे आरामात बसून शिकले असते. पण करायचं काय ? गावातच काय , त्या तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा अशी मोठी छत्री मिळत नव्हती. पावसाळ्यानंतर मात्र जास्त अभ्यास करावा लागायचा. जास्त अभ्यास केल्यानं कमी लक्षात राहायचं.  खरं तर लक्षीकडे खुपशा गोष्टींची उत्तरं होती. परंतु, या गोष्टींचं मात्र उत्तर नव्हतं. पावसाळ्यातला एवढाच एक प्रश्न नव्हता तर गावाजवळून वाहणार्‍या ओढ्याला पूर आला की, गावात एसटी यायची बंद व्हायची. त्यामुळे गावातल्या लोकांना बाजारला तालुक्याच्या गावाला जाता येत नसे. गुरुजीसुद्धा यायचे नाहीत. तोपर्यंत शाळा बंद. दरीत वसलेल्या गावातल्या लोकांचे हाल व्हायचे.
एक दिवस लक्षीच्या गावात बरीच लगबग चालली होती. लक्षीला काय भानगड आहे, कळेना. तिने थेट सरपंचांना विचारलं. सरपंचांनी सांगितलं, परवादिवशी आपल्या गावात मंत्री येणार आहेत. लोकांना भेटणार आहेत. आपल्या अडीअडचणी समजावून घेणार आहेत आणि त्याची उकलही करणार आहेत. सरपंचांनी तिला गावातल्या प्रगतशील शेतकर्‍याचा सत्कार मंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचेही सांगून टाकले. 
लक्षीलासुद्धा मोठा आनंद झाला. ही तर चांगली बातमी आहे, ती पुटपुटली. तिने गावातून फेरफटका मारला. सगळीकडे साफसफाई चालल्याचं दिसलं. मंत्र्यामुळे गावाचा काही तरी फायदा होतोय, असं तिला वाटलं. तिने आपल्या शाळेतल्या मित्रांना ही खबर सांगून टाकली.
लक्षी गुरुजींना म्हणाली, " गुरुजी, आपणसुद्धा मंत्र्यांना भेटायचं का ? आपल्या शाळेची समस्या त्यांना सांगू." मास्तर म्हणाले, " लक्षी , तुझं बरोबर आहे, गं. पण मंत्री मोठी असामी. त्यांच्याजवळ सगळ्यांसाठी वेळ नसतो. आपण आपल्या शाळेचा  प्रश्न पंचायत समितीला अनेकदा कळवला आहे. "
लक्षी म्हणाली, " गुरुजी, आपण मंत्र्यांना सांगू की अधिकार्‍यांना कळवूनही आपले काम झाले नाही. ते नक्कीच गळकं छत बंद करतील. " मास्तरांना त्या चिमुरडीचे म्हणणे पटले. त्यांनी निवेदन लिहायला घेतले. मास्तर आणि लक्षीनं मिळून निवेदन द्यायचं पक्कं झालं.
लक्षीनं घरी आल्यावर आईला ,आता आमची शाळा गळणार नसल्याचं सांगितलं. कार ती समस्या मंत्र्यांच्या कानावर घातली जाणार आहे व  ते त्यांची समस्या सोडवणार आहेत. आई म्हणाली, " जसं काही तू ठरवलसं आणि झालं, असेच बोलतेस. अगं, मंत्र्यांना भेटणं किती कठीण असतं माहीत आहे का ? ते आल्यावर काही मोजकीच माणसं त्यांना भेटू शकतील",  लक्षी नाराज झाली. ती विचार करत राहिली,  आपली शाळा गळायची थांबणारच नाही का ?... विचार करता करता कधी कोणास ठाऊक तिला झोप लागली.
मंत्री गावात येण्याचा दिवस उजाडला. गावात चावडीजवळ एक मोठं व्यासपीठ उभारण्यात आलं होतं.त्यावर चढून जाऊन मंत्री भाषण करणार होते. काही पुरस्कारांचं वितरण करून त्यांना लागलीच दुसर्‍या गावाला जायचं होतं. शाळेतली सगळी मुलं स्वच्छ युनिफॉर्ममध्ये आली होती. गुरुजीसुद्धा सफेद, स्वच्छ कपड्यात आले होते. कारण त्यांना मंत्र्यांना भेटायचं होतं. मंत्रीमहोदय सकाळी अकरा वाजता गावात येणार होते. 
अकरा वाजले आणि गावात सायरन वाजवत पोलिसांची गाडी घुसली. पाठोपाठ मंत्र्यांची लालदिव्याची  अम्बॅसेडर कार आली. त्याच्या मागे आणखी पाच-सात गाड्यांची रांग लागली होती. लक्षीला खूप आनंद झाला कारण , मंत्रीमहोदय अगदी वेळेवर आले होते. थोड्याच वेळात व्यासपीठाभोवती गर्दी जमा झाली. आजूबाजूच्या गावचे लोकही आज लक्षीच्या गावात आले होते. कधी नव्हे इतकी मोठी गर्दी जमा झाली. मंत्र्यांसोबत त्यांचे रक्षकसुद्धा होते. त्यांनी त्यांना गराडा घातला होता.
मंत्री व्यासपीठावर पोहोचले. व्यासपीठावर सरपंच आणि गावातले काही प्रमुख, प्रतिष्टित नागरिक उपस्थित होते. मंत्रीमहोदयांचे स्वागत झाले. गुरुजी लक्षीला म्हणाले की, आता मंत्र्यांपर्यंत पोहोचणं मोठ कठीण आहे. आपण शाळेचे निवेदन त्यांना देऊ शकणार नाही. लक्षीला ऐकून धक्का बसला. सरपंच तिच्याकडे पाहात असते तर तिने इशारा केला असता. पण सरपंच इकडे पाहायलाच तयार नाहीत. शिवाय ती व्यासपीठापासून खूप दूर होती. आता काय करायचं ? गुरुजी म्हणाले, " आपले निवेदन अगोदरच सरपंचांकडे द्यायला हवे होते."  " पण आपली समस्या त्यांना कशी समजणार? ", लक्षीचं म्हणणं पडलं.
व्यासपीठावर मंत्र्यांचे स्वागत- सत्काराचे सोपस्कार पार पडले. सरपंच बोलायला उभे राहिले. आपल्या भाषणात त्यांनी गावात सारे ठीकठाक असल्याचे सांगून टाकले. लक्षीला ऐकून मोठं आश्चर्य वाटले. गावातल्या अडीअडचणी  मंत्र्यांपुढे मांडल्याच जात नव्हत्या. यानंतर मंत्र्यांनी गावातल्या श्रीपतरावांचा प्रगतशील शेतकरी म्हणून फेटा बांधून शाल-प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. नंतर त्यांनी काही घोषणा केल्या. झालं !... त्यांची जाण्याची वेळ झाली. ते व्यासपीठावरून खाली उतरू लागले.
मंत्रीमहोदय आपल्या गाडीकडे जाऊ लागले. इतक्यात लक्षी हात वरकरून मोठ्याने ओरडली," आमची एक समस्या राहिली...." मंत्र्यांनी मागे वळून पाहिले. एक छोटी मुलगी धीटाईने हात वर करून त्यांच्याकडे पाहात उभी होती. त्यांनी तिला जवळ बोलावले आणि  विचारले, " बोल, काय समस्या आहे तुझी ?" लक्षी न घाबरता सांगू लागली, " गावाजवळच्या ओढ्यामुळे पावसाळ्यात गावात एसटी येत नाही. नदीवर पूल बांधायला पाहिजे. आमची शाळा गळते. त्यामुळे शाळेला सुट्टी राहते. ... आम्ही ऑफिसला तक्रार केली आहे. पण शाळा दुरुस्त झाली नाही."
 मंत्री अगदी नवलानं तिच्याकडे पाहात राहिले. किती सफाईदारपणे आणि धिटाईने गावातल्या समस्या सांगत होती.  गावात वीज नसते. त्यामुळे आभ्यासाचे वांदे होतात, हेही लक्षीने सांगून टाकले. मंत्र्यांबरोबरचा सरकारीबाबू सारे टिपून घेत होता. लक्षीने सांगितले की, आम्ही आमची समस्या लिहून आणली आहे. तिने गुरुजींना खुणेने बोलावून घेतले. त्यांनी निवेदन मंत्र्यांकडे सुपूर्द केले. मंत्रीमहोदयांनी तिला विचारलं, " तुझं नाव काय बाळ ?"
" लक्ष्मी ", लक्षीनं धिटाईनं उत्तर दिलं. दोन महिन्यात तुझे प्रश्न सुटतील, असे म्हणत त्यांनी आपल्या कोटाच्या खिशात हात घातला. आणि  त्यातून पेन काढून तिला देत म्हणाले," माझ्याकडून तुला बक्षीस ! गावातले खरेखुरे प्रश्न मांडल्याबद्दल." आणि मंत्रीमहोदय निघून गेले. यानंतर सगळीकडे लक्षीचीच चर्चा.
लक्षीच्या आईला ही गो ष्ट  कळली तेव्हा तिचा ऊर अगदी आनंदाने भरून आला. गुरुजींना तर तिच्याविषयी अभिमान होताच. तो आणखी दुणावला. पुढच्याच महिन्यात शाळेची दुरुस्ती झाली आणि शाळा गळायची थांबली. आता गावाजवळच्या ओढ्यावर पूल बांधण्याचे काम सुरू झालं आहे.     - मच्छिंद्र ऐनापुरे    किशोर, फेब्रुवारी २०१२ प्रसिद्ध

No comments:

Post a Comment