Sunday 19 February 2012

सूडाचा शेवट

एडमंड आणि डँगलर दोघे खलाशी होते. दोघेही एकाच जहाजावर काम करीत. एडमंड मोठा  कष्टाळू आणि प्रामाणिक होता. जहाजाच्या कॅप्टनचाही  त्याच्यावर मोठा भरवसा होता. डँगलर एडमंडवर जळत होता.
एकदा समुद्र प्रवासादरम्यान कॅप्टनचा मृत्यू झाला. एडमंड अशावेळी अगदी समजुतीने वागला. अत्यंत हुशारीने जहाजाची कमान सांभाळली. जहाजाचा मालक त्याच्यावर जाम खूश झाला. त्याने त्यालाच कॅप्टन करून टाकले. आता डँगलर इर्षेने पुरता बेभान झाला.त्याने  एडमंडला गोत्यात आणायचा   विढा उचलला.
एडमंडचे वडिलसुद्धा त्याच्या कर्तबगारीवर खूश झाले. ते एडमंडला म्हणाले. " बेटा, आता तू मर्सीडीसशी लग्न करावंस." एडमंडचा तिच्याशी विवाह पक्का झाला होता. त्यातच आणखी एक तरुण मर्सीडीसशी विवाह करण्यास इच्छुक होता. त्याचं नाव होतं फर्नांड. पण मर्सीडीसलाही एडमंडशीच विवाह करायचा होता.
फर्नांड डँगलरचा मित्र होता. त्याने त्याला सारी हकीकत सांगितली. एडमंडचा काटा काढण्याचे दोघांनी ठरवले. त्याने एलबा टापूत लपलेल्या सरकारविरोधी -विद्रोही नेत्याचे एक गुप्त पत्र आणले आहे. पोलिसांना याची खबर दिल्यास ते त्याला तात्काळ अटक करतील्.दोघांनी आपली योजना प्रत्यक्षात आणली. पोलिसांनी एडमंडला अटक केली. त्याला ज्या दिवशी अटक करण्यात आली होती, त्याच दिवशी त्याचा विवाह होणार होता. पोलिसांनी त्याला न्यायाधीशांसमोर उभे केले. न्यायाधीश विलेफोर्ट एडमंडला म्हणाले, " हे पत्र मी जाळून टाकतो. उद्या तुझी मुक्तता होईल."
एड्मंड सकाळी सुटण्याच्या आशेवर सारी रात्र तुरुंगात काढली. सकाळी चार पोलिस आले. त्याला गाडीत बसवले आणि  निघाले. एडमंड त्यांना म्हणाला, " कशाला माझ्यासाठी तसदी घेता. जाईन मी एकटा."  एक पोलिस  शिपाई म्हणाला," आम्ही तुला तुझ्या घरी नेत नाही आहोत, तर किल्ल्याच्या बंदीखान्यात घेऊन चाललो आहोत."
काही वेळाने त्याला एका छोट्याशा बेटावर नेण्यात आले. तिथल्या एका भग्न किल्ल्यातल्या बंदीखान्यात बंद करण्यात आले. तुरुंगात त्याला अगदी वेड्यासारखं झालं.
एक दिवस एडमंडच्या कोठडीच्या भिंतीवर घाव मारले जात असल्याचा आवाज येऊ लागला. तो समजून चुकला की, कोणी तरी कैदी पळून जाण्यासाठी मार्ग काढीत आहे. एडमंडने त्याला मदत करण्याचे ठरवले. त्याने त्याच्यासाठी येणार्‍या जेवणाच्या ताटाचे मोठ्या प्रयासाने दोन भाग केले. व त्या तुकड्याने तो कोठडीच्या भिंतीचे सिमेंट खरडवून काढू लागला. काही दिवसांनंतर भिंतीचा दगड सैल झाला.
एक दिवस एडमंडने दगड काढला. आता तो पुढच्या योजनेवर विचार करू लागला. त्याच्वेळेला एक हडकुळा वृद्ध त्या छिद्रातून त्याच्या खोलीत आला. वृद्धकैदाने आपली ओळख सांगितली. तो चाळीस वर्षांपासून तुरुंगात होता. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या अवगत होत्या. वृद्ध त्याला या विद्या शिकवू लागला. त्याने एडमंडला एका खजिन्याचे रहस्य सांगितले. हा खजिना मोंटे क्रिस्टो नावाच्या बेटावर होता.
एके रात्री  वृद्धाचा मृत्यू झाला. तुरुंगातल्या कर्मचार्‍यांनी वृद्धाचा मृतदेह एका  तरटात गुंडाळून ठेवला. सकाळ झाल्यावर तो समुद्रात फेकणार होते. त्याने त्या वृद्धाचा मृतदेह आपला अंथरुणावर झोपवला. व वरून त्यावर चादर ओढली. नंतर तरट स्वता: भोवती गुंडाळून घेऊन निपचिप पडून राहिला. त्याने स्वता:जवळ एक चाकू ठेवला.
सकाळी कर्मचार्‍यांनी तरटातला मृतदेह उचलला. त्याला भलामोठा दगड बांधला आणि समुद्रात लोटून दिला. एडमंड तयारच होता. त्याने चाकूने दगडाची दोर कापली आणि पोहत वर आला. काही अंतरावर एक झाड उभे होते. तो पोहत तिकडे गेला. जहाजेत चढल्यावर एडमंडने तिथे त्याने हमालीचे काम पत्करले. काही दिवसांनी जहाज तेथून पुढच्या  प्रवासाला निघाले. बर्‍याच दिवसानंतरच्या प्रवासानंतर जहाज मोंटे क्रिस्टोच्या किनार्‍याला लागले. एडमंडला खजिन्याची आठवण झाली. त्याने कॅप्टनसमोर आजारी असल्याची बतावणी केली. आणि बेटावर उतरला. मात्र परतताना  त्याला  सोबत नेण्याची विनंती केली.    कॅप्टन तयार झाला.
 जहाज निघून जाताच एडमंडने वृद्धाद्वारा सांगितलेल्या निशाणांचा शोध सुरू केला. लवकरच त्याला ती गुहा सापडली. सांगितलेल्या ठिकाणी खणले असता त्याला तिथे एक लोखंडी संदूक मिळाली. त्यात हिरे-जवाहीर आणि सोन्याची नाणी होती. एडमंड या खजिन्याच्यामदतीने आपल्या शत्रूंचा सूड घेऊ शकणार होता. त्याने काही हिर्‍यांनी आपले खिसे भरले. एका थैलीत सोन्याची नाणी भरली. राहिलेले धन तिथेच लपवून ठेवले. आणि समुद्र किनारी येऊन जहाजाची प्रतीक्षा करीत राहिला. जहाज आले. कॅप्टन त्याला घ्यायला विसरला नाही. काही दिवसांनी यथावकाश जहाज फान्सला पोहोचले.
एडमंद नोकरी सोडून पॅरीसला आला. तिथे त्याने एक अलिशान बंगला भाड्याने घेतला. त्यात तो अगदी ऐशआरामात राहू लागला. आता त्याने काऊंट ऑफ मोंटे क्रिस्टो असे नाव धारण केले. यादरम्यान त्याने आपल्याला कोणाकोणामुळे तुरुंगवास भोगावा लागला, याचा शोध घेतला.
सगळ्यात अगोदर त्याने कुणाचा बदला घेतला असेल तर तो डँगलरचा. त्याच्या व्यापाराचे सारे शेअर्स शेअरबाजारात पाडले. एका रात्रीत डँगलर रावाचा रंक झाला. आता फर्नांडची पाळी होती. एडमंडला कळले की, फर्नाडने एका कॅप्टनचा खून करून त्याची सगळी संपत्ती हडप केली होती. त्याने वृतपत्रांमध्ये पुराव्यासह फर्नांडच्या गुन्ह्यांचा पर्दापाश केला. बदनामी झाल्याने फर्नांडने आत्महत्या केली. 
या दोघांचा सूड उगवल्यानंतर एडमंडने मॅजिस्ट्रेट विलेफोर्टकडे आपला मोर्चा वळविला. विलेफोर्टच्या पहिल्या पत्नीपासूनची एक मुलगी होती. तिचे नाव वॅलेंटाइन. पण सगळे तिला वॅलेन या नावानेच हाक मारित.
वॅलेनला आपल्या वडिलोपार्जित लाखोची संपत्ती मिळणार होती. विलेफोर्टची दुसरी पत्नी ही संपत्ती हडपण्याच्या तयारीत होती. बोलता बोलता एडमंड तिला म्हणाला, " माझ्याकडे एकप्रकारचे विष आहे. ते शरीरावर हळूहळू परिणाम करतं आणि माणसाला मारतं." हे ऐकून विलेफोर्टच्या पत्नीचे डोळे दिपून गेले. तिच्यापुढे वॅलेनची संपत्ती नाचू लागली. ती पार हरखून गेली. त्याच्याकडे तिने विषाची मागणी केली. त्यासाठी ती पाहिजे किंमत मोजायला तयार झाली.
काही दिवसांनंतर विलेफोर्टच्या घरात एकानंतर एक अशा तिघाजणांचा मृत्यू झाला. यात वॅलेनचे आजी-आजोबा मृत्यू पावले. शिवाय एका नोकराचाही जीव गेला. वॅलेनसुद्धा आजारी पडली. पण एडमंड्ने तिला वाचवले. वॅलेन मॅक्स नावाच्या एका तरुणावर प्रेम करीत होती. तो त्याच्या जुन्या कॅप्टनचा मुलगा होता.
एडमंड वॅलेनच्या खोलीत लपून राहायचा.तिची सावत्र आई पिण्याच्या पाण्यात विष मिसळून जायची. एडमंड ते पाणी फेकून द्यायचा. विलेफोर्टला मारण्याचा त्याचा बेत होता. पण वॅलेन बापावर खूप प्रेम करीत होती. वडिल गेल्यावर वॅलेन वेडीपिसी होईल, अशी त्याला भीती वाटू लागली. त्यामुळे त्याने दुसरा डाव टाकला. सारी हकीकत वॅलेनला सांगितली. तो म्हणाला," मी तुला एक औषध देतो की ज्यामुळे सारे तुला मृत समजतील. पण तू अजिबात घाबरू नकोस. मी तुला कब्रेतून बाहेर काढीन."
सगळ्या गोष्टी एडमंडच्या म्हणण्यानुसार घडल्या. वॅलन मृत झाली असे समजून विलेफोर्टला अतीव दु: ख झाले. एडमंडने त्याला धीर देत  वॅलेनला त्याच्या दुसर्‍या पत्नीने विष पाजून मारल्याचे सांगितले. मग त्याने आपली खरी ओळख करून दिली. त्याने असे का केले, हेही विलेफोर्टला सांगून टाकले. सागळा प्रकार ऐकून विलेफोर्टच्या डोक्यावर परिणाम झाला. तो आरडत्-ओरड्त रस्त्यावर आला आणि एका गाडीखाली सापडून ठार झाला. 
विलेफोर्टचे छिन्नविछिन्न मृतदेह पाहून त्याचे हृदय द्रवले. त्याने विचार केला की, मनुष्याच्या वाईट कृत्याबद्दल शिक्षा करण्याचा मला कय हक्क आहे. ज्याने माणसाची निर्मिती केली, त्यालाच त्याचा जीव घेण्याचा अधिकार आहे.  त्याला वाटले, आपण आपल्या शत्रूला खूपच मोठी शिक्षा ठोठावली.
एडमंदने वॅलेनला कब्रेतून बाहेर काढले. तिला  मुलगी मानून आपल्या घरी आणले. ती खडखडीत बरी झाल्यावर तिचा विवाह मोठ्या थाटामाटात मॅक्सशी करून दिला.त्याने  आपली सगळी संपत्ती लोककल्याणासाठी दान केली.  ( विदेशी कथा: फ्रेंच लेखक ऍलेक्झांडर ड्यूमा)  अनुवाद - मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment