Monday 20 February 2012

भाज्यांनी धडा शिकवला

 .
टप्पूला चॉकलेट, कुरकुरे असलं बाहेरचं खाणं फार आवडे. चाट मसाल्याचा तर भारी शौकीन. त्याला आवडत नसायच्या त्या म्हणजे भाज्या. कुठलीच भाजी त्याला आवडायची नाही. त्यापासून बनवलेल्या कुठल्याही पदार्थांकडे तो ढुंकूनही पाहत नसे. त्याच्या या वाईट सवयीमुळे त्याची मम्मी त्याला नेहमी रागे भरायची. उपदेशाचे डोस द्यायची. पण टप्पूवर त्याचा काही एक परिणाम व्हायचा नाही. मम्मी पार वैतागून गेली होती.

टप्पूचा मामा येणार म्हणून मम्मीने त्याच्या आवडीचा गाजर हलवा बनवला होता. गोड तुपातला चवदार हलवा टप्पूनेही खावा म्हणून मम्मीने त्याला खूप सांगितले. पण व्यर्थ. तो आपल्या जिद्दीवर ठाम राहिला.
आपले सारे जग कोडकौतुक करतं. आपला महिमा गायिला जातो. पण हा टप्पू मात्र आपली हेटाळणी करतो. आपल्याकडे धुंकूनही पाहत नाही. याचा राग भाज्यांनाही होता. टप्पूला धडा शिकवायचा त्यांनी निश्चय केला.
टप्पूचा मामा आल्याने रात्री जेवणाचा मोठा बेत केला  होता. इकडे भाज्यांनीही आपली योजना साकारायला सुरुवात केली होती. दिवाणखान्यात मात्र मस्त गप्पाटप्पा रंगल्या होत्या. मामा आपल्या भाच्याला झक्कास गोष्टी सांगत होता. टप्पू त्या मन लावून ऐकत होता. स्वयंपाक खोलीतून घमघमाट सुटला होता. सगळ्यांना कडकडू भूक लागली होती. मम्मीने जेवण तयार असल्याची वर्दी दिली तशी सारी मंडळी जेवणाच्या टेबलाभोवती गोळा झाली.
बासुंदी, पुरी, गुलाम जामून ,विविध प्रकारच्या भाज्या, झक्कास रस्सा, पापड, कुरडई, लोणचे असा सारा बेत होता. टप्पूने घाईघाईने पुरीचा तुकडा  बासुंदीत बुडवून खाल्ला. " ई! बासुंदी कडू कशी काय? " टप्पू ओरडला. पप्पा ओरडले , " काय तर काय  बोलतोयस टप्पू? बासुंदी आणि कडू... ? वेडबिड तर लागलं नाही ना"
मामा म्हणाला, " अरे, टप्पू, बासुंदी किती गोड झालीय. आणि त्याला तू कडू म्हणतोयस ?" पण यातला मामला कुणालाच माहित नव्हता. कारण कारल्यानं आपला रस पिळून टप्पूच्या बासुंदीच्या वाटलीत टाकला होता. टप्पू मात्र त्या वाटीला हात लावायलासुद्धा तयार नव्हता. मम्मीने त्याला गुलाब जामून दिले. त्याने एक जामून तोंडात टाकले. टप्पूने ते पटकन थुंकून टाकले. दोड्क्याने बचकभर मीठ त्यात टाकले होते. " यात मीठ कोणी टाकले? ममीने जामून खाऊने पाहिले तर गोड लागले. मम्मी म्हणाली , जामून तर गोड आहे. " आता तीसुद्धा टप्पूवर चिडली. सगळे शांत आणि मनसोक्त जेवत होते. फक्त टप्पू मात्र कुरापती काढत  होता. " जेवायचे असेल तर जेव नाही तर उठून जा', मम्मी ओरडली. टप्पू मुकाट्याने उठून गेला.
रात्री सारे आपापल्या बिछान्यावर झोपी गेले. टप्पू अगोदरच येऊन पडला होता. पण त्याला झोप येत नव्हती. प्रचंड भूक लागली होती. पोटात कावळ्यांनी नुसता धिंगाणा घातला होता. सगळीकडे सामसूम झाल्यावर टप्पू हळूच गुपचूप उठला. त्याने स्वयंपाक खोलीत जाऊन फ्रिज उघडला. कॅडबरी उचचली.  त्याचा लचका एक तोडला. पण कॅडबरी गोड लागण्याऐवजी तिखटजाळ लागली. तुकडा थुंकून दिला. बटाट्याने त्यात तिखट मिसळले होते. प्लेटमध्ये त्याला हलवा दिसला. जिभेचा दाह कमी होईल म्हणून त्याने एक चमचा हलवा तोंडात टाकला. गोड गोड हलव्याच्या  थंडव्याने त्याला खूप बरे वाटले. दाह कमी झाला. त्याने आवडीने सगळा हलवा संपवून टाकला.  आणि शांत झोपी गेला.
 सकाळी मम्मीने फ्रिज उघडला. त्यात हलव्याची प्लेट रिकामीच दिसली. तिने सगळ्यांना विचारले. टप्पूने आपण खाल्ल्याचे कबूल केले. सगळ्यांना आश्चर्य वाटले. भाजी आणि भाज्यांच्या पदार्थांना नावे ठेवणारा , त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहणारा टप्पूने हलवा खाऊन टाकला  तोही न सांगता. टप्पू म्हणाला, " यापुढे भाज्यांना नावे ठेवणार नाही. भाज्या चांगल्या असतात, हे आता मला कळून चुकले आहे. "                                                        

न्यायी राजा

राजा चंद्रसेन मोठा शूर, दानी आणि न्यायी होता.  अनोख्या न्यायाबद्दल त्याची ख्याती होती. चंद्रसेन राजाच्या राज्यात दुर्गापूर नावाचे एक गाव होते. तेथील प्रजा सर्वार्थाने सुखी होती. पण काही दिवसांपासून गावची झोप उडाली होती. गावात चोर्‍या हो ऊ लागल्या होत्या. गावात कोणी अनोळखी मुक्कामी राहिल्यास तर हमखास चोरी होत असे. त्यामुळे वाटसरू अथवा अनोळखी माणसाला गावात मुक्कामाला राहू दिले जात नसे.
एकदा एक ब्राम्हण कुठे तरी निघाला होता. प्रवासात अंधार पडल्याने त्याने दुर्गापूर गावात मुक्कम करण्याचे ठरविले. मात्र त्यास कोणी राहण्यास जागा दिली नाही. शेवटी खूप विनंती-विनवणी केल्यावर एका विणकर्‍याने त्याला राहण्यास परवानगी दिली. मात्र विणकर्‍याने बजावून सांगितले, कोणी परका गावात आला की हमखास चोरी होते. त्यामुळे सकाळी जाताना सर्व चिजा दाखवून पुढच्या वाटेला निघावं , हे चांगल.
ब्राम्हणाने अट कबूल केली. दोघेही अंथरुणावर पहुडले. विणकरास लागलीच झोप लागली परंतु, ब्राम्हण जागाच होता. नवी जागा, चोरीची भीती यामुळे त्याला झोप येत नव्हती.पहाटे पहाटेच्यावेळी डोळे जड हो ऊ लागले होते, तेवढ्यात घरात कोपर्‍यात कोणीतरी अंधारात चाचपडत असल्याचे त्याला दिसले. ब्राम्हण खडबडून जागा झाला. त्याने अंधारातच त्याठिकाणी झडप घातली. त्याच्या हाताला एक चोर लागला. चोर दरडावत म्हणाला, स्वतः ची पर्वा असेल तर मुकाट्याने मला सोड. तुला ठाऊक नाही, मी इथला पाहरेकरी आहे.
ब्राम्हणाने त्याच्या धमकीला भीक घातली नाही. उलट ब्राम्हण म्हणाला, ' तुला सोडलो तर सकाळी मलाच चोर समजलं जाईल'  दोघात झटापट झाली. ब्राम्हणाने  जखडून ठेवल्याने पाहरेकर्‍याने नवीन्च युक्ती काढली आणि ब्राम्हणाचा हात धरून जोरजोरात ओरडू लागला, चोर, चोर... धावा.. धावा
विणकर्‍यास आजूबाजूचे लोक धावले. पाहतात तर पाहरेकरी आणि ब्राम्हण. पाहरेकर्‍याने ब्राम्हणाचे हात धरलेले. लोकांनी पाहरेकर्‍याची बाजू घेतली. शेवटी न्याय राजाच्या दरबारात गेला. ब्राम्हणाने सारी हकिकत कथन केली. त्याच्या चेहर्‍यावरील विश्वास पाहून राजाने ब्राम्हण चोर नसल्याचे ताडले. तो निर्दोष आहे. परंतु, निर्दोष असल्याचा पुरावा दरबारास हवा होता. राजाने त्यांना तीन दिवसानंतर पुन्हा दरबारात येण्यास सांगितले.
तिसर्‍या दिवशी दोघेही दरबारात आले. तेव्हा राजाने दोघांनाही हुकूम सोडला. इथून एका मैलावर एक नदी आहे. त्याच्या काठावर कापडात एक मृतदेह गुंडाळून ठेवला आहे. तो तुम्ही दोघांनी अलगद दरबारात आणा. आल्यावर तुमचा फैसला सुनावला जाईल. सेवक आणि ब्राम्हण दोघेही निघाले. नदीच्या काठावर खरोखरच कापडात गुंडाळलेला मृतदेह होता. दोघांनी तो अलगद उचलला. परताना सेवक खुशीत होता.  तो म्हणाला,पंडीत महाशय, आता कसं वाटतंय. गेल्यावर चापकाचे फटके बसतील तेव्हा कळेल, माझ्याशी पंगा घेतोस काय?
बिचारा ब्राम्हण निराश झाला होता. तो एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, माझ्यासारख्या निर्दोषाला हकनाक गोवलंस. राजाची शिक्षा मी सहन करीन. पण वरचा देव तुला कदापि माफ करणार नाही. अशा भल्या-बुर्‍या गोष्टी ऐकत्-ऐकवत दोघे दरबारात पोहचले. त्यांनी मृतदेह खाली ठेवला. राजाने त्यावरील कापड हटवण्यास सांगितले. कापड हटवले गेले आणि काय आश्चर्य! मृतदेहाऐवजी एक जिवंत व्यक्ती उठून उभी राहिली.
वास्तविक राजाच्या सूचनेनुसार गुप्तहेर कापडात पहुडला होता. त्याने वाटेतला दोघांमधला संवाद राजापुढे कथन केला. ते ऐकून राजाने पाहरेकरी सेवकास शंभर फटक्याची तसेच तडिपारची शिक्षा सुनावली. ब्राम्हणाला काही धन देऊन राजाने त्याची सन्मानाने पाठवणी केली. यानंतर मात्र कधी दुर्गापूर गावात चोरी झाली नाही. .- मच्छिंद्र ऐनापुरे, जत  gavakari.sap.11

न्यायी राजा

अहंकार गळाला

एक पैलवान होता. कुस्तीत त्याला तोड नव्हती. साहजिक त्याच्यात अहंकार भिनला होता. तो इतका की बोलायचे काम नाही. कोणी कुस्ती खेळतोय म्हटलं की, पट्ट्या त्याच्या दारात हजर असायचा. त्याला धमकी द्यायचा. आव्हान द्यायचा. समोरच्याला चितपट केल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. दुसर्‍याला पराजित करण्यात आसुरी आनंद वाटत असे. एखाद्याला मैदानात चितपट केल्यावर अहंकाराने तो मोठ्याने फुत्कारायचा. " आहे का कुणी माय का लाल, माझ्याशी कुस्ती लढायला तयार? या समोर असे."
या त्याच्या अहंकारी वागण्याने त्याच्याशी कोणीही कुस्ती लढायला तयार होत नसे. इतकेच काय तर त्याच्या वार्‍यालाही कोणी थांबत नसे. बोलणे तर दूरच! दिवस जात होते. आता पैलवानास एकटेपणाचा उबग येऊ लागला. एकटेपण त्याला खायला उठले. त्याची मनस्थिती बिघडू लागली. तो कुणाशी बोलायला जाई, पण ती माणसे निमुटपणे उठून निघून जात.
 एकदा एक संत महात्मा गावात आला. गावाबाहेर नदीकाठी झोपडी बांधून राहू लागला. त्यांना भेटायला , आशीर्वाद घ्यायला दूर्-दूरवरून लोक येत. संत महात्मा त्यांच्या अडीअडचणी, समस्यांचे निराकरण करीत असे. त्यामुळे त्यांचे महात्म्य दूर दूर पसरले होते. संतांचा महिमा पैलवानाच्याही कानी पडला. एक दिवस तोही संतांच्या भेटीला गेला.
" महाराज, मी एक प्रसिद्ध मल्ल आहे. माझा कुणीही पराजय करू शकला नाही. माझ्याजवळ खूप धन-दौलत, मान्-सन्मान आणि ऐश्वर्य आहे. पण माझे चित्त अशांत आहे." संतांनी स्मितहास्य केले, " मी तुझे नाव ऐकून आहे, आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. पैलवानी ही एक कला आहे. ती अभ्यास, सरावाने साध्य होते. ..." त्यांचे बोलणे तोडत पैलवान मध्येच म्हणाला," महाराज, मी यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. दाही दिशांत माझ्यासारखा पैलवान शोधूनही सापडणार नाही. "  संत पुन्हा हसले आणि म्हणाले, " अहंकार रावणालासुद्धा होता. पण या अहंकाराने त्याची सारी शक्ती हिरावून नेली.जरा विचार कर. तू ज्या कुणाचा पराभव करायचास त्याला त्याचं दु: ख तर वाटत असणारच. तू कधीही पराजित झाला नाहीस. सदा जयाचीच चव चाखत आलास. त्यामुळे तुझ्या प्रत्येक विजयाने तुझा अहंकार वाढत गेला. पण माझ्या पैलवान मित्रा, जीवनातले सारे यश केवळ विजयात असत नाही. उद्या तुझे शरीर थकून जाईल. जर्जर होईल. हात-पाय कंप पावतील्.तेव्हा तुझा अहंकार आपोआप गळून पडेल. अजून वेळ गेलेली नाही. तुझे अशांत चित्त शांत कर. तुझ्यानंतर या धन्-दौलत, मान्-सन्मान, ऐश्वर्याला काय अर्थ आहे? तेच तू गोरगरीब, वंचितांच्या सत्कारणी लाव. असाह्य लोकांची सेवा कर. मग बघ, तुझा एक चांगला मल्ल त्याचबरोबर एक सच्चा साधक म्हणून नावलौकिक मिळेल. लोक तुझे गुणगान गातील."
पैलवान सदगदीत झाला, '" तुम्ही मला एक नवी वाट दाखवलीत. महाराज, तुम्ही माझे डोळे उघडलेत...मला आता जीवनाचं रहस्य समजलं", असे म्हणत पैलवानाने संतांचे पाय धरले.                                

दृष्टीकोन

एक श्रीमंत व्यक्ती नेहमी आचार्य महाप्रज्ञ यांच्याकडे येत असे. ती व्यक्ती मोठी उद्योगपती होती. एकदा आचार्यांनी त्याला विचारलं, ' सध्या तुझ्याविरोधात वीस-पंचवीस केसेस चालू आहेत. तुझ्या अनेक प्रतिष्ठानवर कित्येकदा छापे पडले आहेत. काही कंपन्यांना सिल ठोकण्यात आले आहे. इन्कम टॅक्सवाल्यांचा तर सतत तुझ्यावर डोळा असतो. कॉरपोरेट विश्वात तू एक 'बदनाम व्यक्ती' म्हणून ओळखला जातोस. या सगळ्या गोष्टींमुळे तुला  कसलं सुख मिळतं?'
ती  व्यक्ती पहिल्यांदा थोडं गांभिर्यानं, नंतर बेपर्वाईनं म्हणाली, ' महाराज, माझी एक इच्छा होती की, मी देशातला एक नंबरचा उद्योगपती बनावं. मी या दिशेने वाटचाल केली. करोडोंची संपत्ती जमा केली. माझ्या मनाला मोठी शांती मिळाली. आता मी या संपतीचा भोग घेऊ अथवा ना घेऊ, याचा माझ्यावर आता काहीही परिणाम होत नाही. कोण माझ्याबाबतीत काय म्हणतो, काय विचार करतो, याची मला अजिबात पर्वा वाटत नाही.'
प्रत्येकाचं आपापलं चिंतन असतं. विचार करण्याची  पद्धतसुद्धा वेगळी असते. आपण नैतिकता, प्रामाणिकपणा, त्याग , संयम, अनुकरण इत्यादी गोष्टींबाबत बोलत असतो.  पण 'व्यक्ती तितक्या प्रकृती'  या न्यायानं प्रत्येकाचा विचार करण्याचा एक अंदाज असतो. त्यामुळे पहिल्यांदा समोरच्या व्यक्तीचा दृष्टीकोन , विचार समजून घेतला पाहिजे. माणसं समजून घेणं त्यामुळेच कठीण जात असतं. त्याचा दृष्टीकोण   चांगला की वाईट हा नंतरचा प्रश्न.  कारण तो त्याच मस्तीत जगत असतो. दृष्टीकोण बदलणार नसेल तर त्याचं आचरण बदलण्याची शक्यता कमीच असते. पहिल्यांदा दृष्टीकोण मग आचरण. जशी दृष्टी तशी सृष्टी.  हा निसर्गनियम आहे. त्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या तर्‍हेची आणि विक्षिप्त माणसं भेटत असतात.

विनम्रतेचा मार्ग

 जॉन रेंडाल्फ नावाचा एक श्रीमंत युवक आपल्या घोड्यावर स्वार हो ऊन आपल्या गावाकडे निघाला होता. त्या काळात रस्त्यांची अवस्था खूपच बिकट होती. त्यामुळे तो जमेल तसे सावकाश आपला गाव जवळ करत होता. प्रवास करता करता रात्री झाली. जॉन एका हॉटेलात उतरला. हॉटेलच्या मॅनेजरने अथितीचे स्वागत केले. मॅनेजरने उत्तम अशी जॉनसाठी भोजनाची व्यवस्था केली. त्याने जॉनला प्रवासातील वातावरण, रस्त्याची अवस्था आणि भेटलेल्या माणसांविषयी विचारलं. जॉनने मात्र कुठल्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही. काही एक न बोलता शांतपणे भोजन करून झोपण्यासाठी निघून गेला.
दुसर्‍यादिवशी जॉन आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला तेव्हा मॅनेजरने त्याला विचारले," तुम्ही कोणत्या रस्त्याने जाणारा आहात?"  या प्रश्नावर जॉन काहीसा रागात म्हणाला,"  तुमचे बिल चुकते केले आहे. आता मी कोणत्याही रस्त्याने जाऊ, त्याच्याशी तुमचा काहीही मतलब नाही."  यावर बिचारा मॅनेजर गप राहिला. जॉन आपला घोडा घेऊन पुढे निघाला.
थोडे पुढे गेल्यानंतर जॉनला दिसलं की, पुढे रस्त्याला दोन फाटे फुटले आहेत. तिथे कुठेच मार्गदर्शक फलक दिसत नव्हता. त्यामुळे त्याला कुठल्या रस्त्याने जावे याचा अंदाज येईना. जॉन पुन्हा माघारी परतला. मॅनेजरला विचारलं," मला कोणत्या रस्त्याने जावं लागेल?"
यावर मॅनेजर म्हणाला," मी तुम्हाला तेच सांगणार होतो. परंतु, आता तुम्ही कोणत्याही रस्त्याने जा. मला त्याच्याशी काही मतलब नाही." जॉनच्या लक्षात आले की,  आपण त्याच्याशी व्यवस्थित वागलो नाही. म्हणून तो नाराज झाला आहे.जॉन निमुटपणे माघारी परतला. त्यातला एक रस्ता त्याने निवडला. सहा तास चालल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आपण चुकीच्या मार्गाने आलो आहोत.आता  जॉन समजून चुकला की,  दुसर्‍यांशी विनम्रतेने वागले पाहिजे आणि त्यांच्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत.

मनाला लगाम

इतिहासातल्या तैमूरलंगला कोण ओळखत नाही. तो एक क्रूर, आततायी पण बुद्धिमान शासक होता. एका पायानं लंगडा असल्यानं त्याच्या नावापुढं 'लंग' हा शब्द लागलेला होता. तो दिसायला अत्यंत कुरूप होता, मात्र साहस आणि समजुतदारपणा त्याच्या अंगी ठासून भरलेला होता. तो नेहमी घोड्यावर स्वार असायचा. त्याने कित्येक प्रदेश जिंकत, लुटत आणि मिटवून टाकत काबूल, कंदहारहून हिंदुस्थानात आला. इथे त्याने मनसोक्त लुटमार केली. इथून परत जायला निघाला तेव्हा दिल्लीच्या शासकाने त्याला भेट म्हणून हत्ती पेश केला. तैमूर पहिल्यांदा हतीवर बसला. बसल्यावर लगेचच म्हणाला,' याची वेसन आता माझ्या हातात द्या. ' त्याला सांगितलं गेलं की, हा हत्ती आहे. याला वेसन असत नाही. तुम्ही मध्ये आरामशीर बसा. पुढे त्याचा माऊत बसेल, तोच छोट्याशा अंकुशद्वारा हत्तीवर नियंत्रण मिळवेल.
तैमूर तात्काळ हत्तीच्या पाठीवरून खाली उतरला. म्हणाला,' मला असली सवारी नको आहे, ज्याची वेसन माझ्याऐवजी कुणा दुसर्‍याच्या हातात असेल.' मनरुपी घोड्याचे वेसन्सुद्धा अशाप्रकारे आपल्या हातात्च ठेवायला हवे. त्याला काबूत ठेवा. अन्यथा मनरुपी घोड्यावर तुम्ही नाही तर तोच तुमच्यावर स्वार होईल. नियंत्रण अथवा लगाम आपल्या हाती असणं खूप आवश्यक आहे.
आजची सगळ्यात मोठी समस्या आहे ती, इमोशनल प्रॉब्लेमची! संवेग खूप प्रबळ आहे. त्यावर नियंत्रण आवश्यक आहे. शब्द,रूप, रस, गंध, स्पर्श या सगळ्या वस्तू लुभावणार्‍या आहेत. आपण यांचे दास बनून जातो. संयम बाळगत नाही. यांच्या मागणीला आपण चटकन होकार देऊन जातो. भाव  क्षणक्षणाला भटकवतात.  जोपर्यंत इंद्रियांवर , मनावर आणि आपल्या भावनांवर आपलं नियंत्रण राहणार नाही, तोपर्यंत नैतीकतेच्या गोष्टी केवळ सांगून किंवा ऐकून आचरणात येणं अशक्य आहे.  सतत चौखूर उधळणार्‍या मनाला नियंत्रणात ठेवणे ही तारेवरची कसरत असली तरी न कंटाळता नियंत्रणासाठी प्रयत्नशील असण्यातच माणसाचे कल्याण आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. ..