Sunday 19 February 2012

बालकथा                                              खरा संत
     नारायणाने  व्याजाने पैसे देऊन, लोकांच्या मुंड्या मुरगाळून  व अवैध व्यवसायातून मोठी कमाई केली होती. तो आता  गडगंज संपत्तीचा मालक झाला होता. आपण केलेल्या पापाचे  क्षालन करून पापमुक्त व्हावे, असे त्याला वाटू लागले. गंगेत स्नान व  दानधर्म केल्यावर पापक्षालन होते, असे त्याने  ऐकले होते. त्यासाठी तो हरिद्वारला गेला. गंगेत स्नान केले. आता एखाद्या गरजवंताला दानधर्म करावा आणि आपल्या गावाला निघावे, असा विचार करून ते त्याच्या शोधात राहिला.  जवळच एके ठिकाणी एक महात्मा ग्रंथाचे पठन करीत  बसले होते. त्यांनाच दानधर्म करावा, या उद्देशाने तो साधू महात्म्याला म्हणाला," माझी  दान करण्याची इच्छा आहे,  आपण माझ्याकडून दान स्वीकाराल का? महात्मा म्हणाले, ‘तू दान का करतो आहेस?' त्यावर नारायण सावकाराने सगळे काही सांगून टाकले. महात्मा म्हणाले," गंगेत स्नान केल्यावर आणि संतांना  रुपये दान केल्यावर तू सर्व पापातून मुक्त होशील असे वाटत असेल तर चुकीचे आहे.  मला तर त्या पैशाची कहीच आवश्यकता नाही. पण यापुढे पापीपणे वागणार नाही, असे ठरवून वागलास तर मात्र देव तुला क्षमा करील. मिळकतीतील थोडे फार धन गोरगरिबांना वाटत राहा. देव तुझे कल्याण करील." असे म्हणून साधू महात्मा तेथून निघून गेले.
       तपस्वी आणि खर्‍या साधूशी आपली भेट झाल्याचा त्याला आनंद झाला. साधू- महात्मे लोभी नसतात किंवा पैशाने विचलित होत नाहीत, याचा त्याला प्रत्यय आला.  मात्र आपण दानासाठी आणलेले पैसे कुणाला तरी दान द्यायला हवेत. ते परत माघारी घेऊन जाणे, योग्य नव्हे. असा विचार करून तो दानयोग्य व्यक्तीच्या शोधात राहिला. पुढे एकेठिकाणी त्याला लोकांची मोठी गर्दी दिसली. तिथे गेल्यावर त्याला एक साधू हात जोडून आणि डोळे बंद करून एका पायावर उभा असलेला दिसला. त्याच्या बाजूला एक  भगवे वस्त्र घातलेला  शिष्य उभा होता. नारायण सावकार शिष्याशी बोलला. "महाराज कधीपासून असे उभे आहेत?’'  शिष्य म्हणाला, ‘दोन दिवस आणि दोन रात्री. नारायणाने विचारले, '‘याने काय साध्य होईल?’ साधूचा शिष्य म्हणाला, ‘ही तपश्चर्या आहे. या कठोर तपश्चर्येने  भक्त ईश्वराला प्रसन्न करतो.’ नारायणास शंका आली. त्याने साधू महाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवले व  म्हणाला, ‘मी आपल्याला पाच लाख रुपये दान म्हणून दिल्यास महाराज तपश्चर्या थांबवतील काय?
     ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले, ‘तुझ्याजवळ खरेच एवढे पैसे आहेत?’ नारायणाने आपल्याजवळील  बॅग उघडून दाखवली.  शिष्याने लगेच गुरूच्या कानात काही तरी खुसफूस केली.  साधूने पटकन डोळे उघडले आणि नारायणकडे हात पसरत म्हणाला, ‘बाळ पैसे माझ्याजवळ दे. मी आपली तपश्चर्या भंग केली आहे.’ नारायण संतापला, म्हणाला, ‘ढोंगी कुठला? चल हो बजूला." असे म्हणून नारायण तेथून चालू लागला. चिमटा उचलत साधू रागाने म्हणाला,'मुकाट्याने पैसे दे, नाहीत तर ..."  नारायन घाबरून पळत सुटला. गुरू-शिष्यसुद्धा त्याच्या मागे धावले.
त्याची तपश्चर्या पाहायला उभे असलेले लोक त्यांच्याकडे पाहातच राहिले. त्यांचा खरा चेहरा उघड झाला. नारायणने आपले पैसे एका अनाथलयाला देऊन टाकले. खर्‍या संतांसारखा वागू लागला.

No comments:

Post a Comment