Sunday 19 February 2012

मूळ कारणाचा शोध घ्या!

     मुल्ला नसरूद्दीन बादशहाच्या नोकरीत होता. एक दिवस बादशहा बागेत फेरफटका मारीत होता. नसरूद्दीनसुद्धा सोबत होता. अनवाणी पायाने फिरताना अचानक बादशहाच्या पायात काटा घुसला, तो महालाच्या परसदारी किंवा बोरीच्या बनात नाही, तर चक्क बागेत. आपला पाय धरून बादशहा विव्हळत खाली बसला. मुल्लाने लगेच आपल्या डोक्याचे वस्त्र काढले नी खाली जमिनीवर अंथरत म्हणाला, ‘आपण यावर झोपावे!’’ बादशहा आडवा झाला. मुल्लाने लगबगीने आपल्या खिशातून आरसा काढला व बादशहाच्या डोळ्यांसमोर धरत म्हणाला, ‘‘डोळे उघडावेत हुजूर!’’
बादशहा पटकन उठून बसत म्हणाला, ‘‘नसरूद्दीन तुला वेड तर लागले नाही ना?’’
‘‘नाही...! मी ठीक आहे हुजूर.’’
‘‘तू होशमध्ये आहेस का?’’
‘‘मी अगदी व्यवस्थित आहे, जहांपनाह.’’
‘‘मग हे काय करतो आहेस?’’
‘‘इलाज करतो आहे, जहांपनाह.’’
‘‘काटा माझ्या पायात घुसला आहे.’’
‘‘पण जहांपनाह, तो डोळ्यांच्या खराबीमुळे घुसला आहे. म्हणूनच मी त्याचा इलाज करतो आहे. डोळ्यांची खराबी दूर झाली नाही तर काटा पुन: पुन्हा पायात घुसणार’’, मुल्ला म्हणाला.
सध्या देशात अशीच परिस्थिती आहे. प्रश्‍नांच्या, समस्यांच्या उद्भवलेल्या मूळ कारणांचा शोध घेतला जात नाही. आम्ही काटा काढण्याच्याच (एकमेकांचाही) मागे लागलो आहोत. भविष्यात काटा कधीच मोडू नये, याविषयी मात्र प्रयत्न होताना दिसत नाहीत. प्रश्‍नांची सोडवणूक ही त्याच्या मूळ कारणांच्या शोधावर आणि ती दूर करण्याच्या संकल्पावर आहे याचा विसर सार्‍यांनाच पडला आहे.
- मच्छिंद्र ऐनापुरे 

No comments:

Post a Comment